129
‘गणेशम फेज २’ दुर्घटनेनंतर भाजप आक्रमक! पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांना शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांचे कडक निवेदनाद्वारे उपाययोजनांचे आदेश
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. २२ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: १८ सप्टेंबर २०२६ रोजी पिंपळे सौदागर येथील ‘गणेशम फेज २’ सोसायटीत घडलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाची दुरवस्था आणि प्रशासकीय ढिसाळपणा उघड झाला आहे. या गंभीर घटनेची तातडीने दखल घेत भारतीय जनता पक्षाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांनी महापालिका आयुक्तांना कडक शब्दांत लेखी निवेदन सादर केले असून, प्रशासनाच्या कारभारावर जोरदार ताशेरे ओढले आहेत.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाची एकहाती सत्ता असताना, महापालिकेचे सत्तारूढ पक्षनेते, स्थायी समिती सभापती आणि महापौर पदावर भाजपचेच लोकप्रतिनिधी कार्यरत आहेत. असे असतानाही खुद्द भाजप शहराध्यक्षांनाच महापालिका प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेऊन कडक इशारा द्यावा लागल्याने, पालिकेच्या ढिसाळ कारभारावर आणि प्रशासनावरील धाक उरला नसल्याच्या बाबीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पिंपळे सौदागर येथील दुर्घटनेत एका बंद फ्लॅटमध्ये दोन निष्पाप लहान मुली जिवंत अडकून पडल्या होत्या. त्या चिमुकल्यांचा जीव धोक्यात असताना अग्निशमन दलाच्या जवानांकडे असणाऱ्या नादुरुस्त व अपुऱ्या उपकरणांमुळे तसेच नियोजनाच्या अभावामुळे बचावकार्यात प्रचंड अडथळे आले. शहरात २० ते ३० मजल्यांच्या उंच इमारती उभ्या राहत असताना तेथपर्यंत पोहोचू शकतील अशा आधुनिक हायड्रोलिक शिड्या (Hydraulic Ladders) पालिकेकडे उपलब्ध नसणे, ही अत्यंत धक्कादायक बाब असल्याचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले.
५० ते ९० मीटर किंवा त्याहून अधिक उंचीपर्यंत सहज पोहोचू शकणाऱ्या आंतरराष्ट्रीय मानकांच्या हायड्रोलिक शिड्या व प्लॅटफॉर्म्स (Bronto Skylift) अग्निशमन ताफ्यात तात्काळ समाविष्ट करावेत. ‘फायर ऑडिट’ अहवाल ७ दिवसांत जाहीर करा: शहरातील सोसायट्यांचे झालेले फायर ऑडिट, आढळलेल्या त्रुटी आणि दिलेल्या नोटिसांचा सविस्तर अहवाल महापालिकेने पुढील ७ दिवसांत सार्वजनिक करावा. अग्निशमन दलातील वाहने, पंप, ऑक्सिजन मास्क व उपकरणांचे ऑडिट करून जुनाट साहित्य मोडीत काढून नवीन आधुनिक साधने पुरवावीत. जवानांना उंच इमारतींमधील आपत्कालीन बचावकार्याचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण देऊन सोसायट्यांमध्ये नियमित ‘मॉकड्रिल’ (Mock Drill) आयोजित करावेत.
“पिंपरी-चिंचवडकर नागरिकांचा आणि त्यांच्या लहान मुलांचा जीव अत्यंत मोलाचा आहे. केवळ इमारतींना मंजुरी देऊन करवसुली करण्यापुरती महापालिकेची जबाबदारी मर्यादित नाही, तर नागरिकांच्या सुरक्षिततेची हमी देणेही तितकेच महत्त्वाचे आहे. ‘गणेशम फेज २’ मधील घटना ही प्रशासनासाठी शेवटची धोक्याची घंटा आहे. महापालिकेने येत्या ८ ते १० दिवसांत या मागण्यांवर ठोस पावले उचलावीत.”— शत्रुघ्न (बापू) काटे (शहराध्यक्ष, भाजप पिंपरी-चिंचवड)
© २०२६ मॅक्स मंथन Daily News. सर्व हक्क राखीव.
