27
‘स्वच्छता ही सेवा २०२६’ अभियानांतर्गत पिंपरी चिंचवडमध्ये विविध उपक्रम; नागरिकांच्या सहभागावर महापालिकेचा भर!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, दि. २४ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: केंद्र शासनाच्या ‘स्वच्छता ही सेवा २०२६’ अभियानांतर्गत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरात १७ ऑक्टोबरपर्यंत विविध स्वच्छता व जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ‘स्वच्छ भारत, विकसित भारत’ ही यंदाच्या अभियानाची मुख्य संकल्पना असून स्वच्छता, जनजागृती आणि नागरिकांचा थेट सहभाग यावर महापालिकेने विशेष भर दिला आहे.
या अभियानांतर्गत शहरातील प्रमुख सार्वजनिक ठिकाणी विशेष स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. शाळांमध्ये ‘स्वच्छ पाठशाळा’ उपक्रमासह स्वच्छता शपथ, मानवी साखळी आणि जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित केले जात आहेत.
तसेच सफाई मित्रांसाठी कल्याणकारी उपक्रम, नागरिकांचा सहभाग आणि टाकाऊ वस्तूंचा कलात्मक पुनर्वापर करून सार्वजनिक ठिकाणांचे सुशोभीकरण करण्यावर विशेष लक्ष केंद्रित केले जात आहे.
कचरा व्यवस्थापनाला गती देण्यासाठी ओला, सुका, सॅनिटरी आणि विशेष काळजीयोग्य अशा चार प्रकारे कचऱ्याचे घरातच विलगीकरण करून तो महापालिकेच्या कचरा संकलन यंत्रणेकडे देण्याचे आवाहन करण्यात येत आहे. कचरा सार्वजनिक ठिकाणी न टाकता तो थेट महापालिकेच्या घंटागाडीतच द्यावा, यासाठी विविध माध्यमांतून जनजागृती केली जात आहे.
“स्वच्छता ही केवळ अभियानापुरती मर्यादित न राहता नागरिकांच्या दैनंदिन जीवनशैलीचा भाग होणे आवश्यक आहे. ‘स्वच्छता ही सेवा २०२६’च्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश घराघरापर्यंत पोहोचवून नागरिकांचा सहभाग वाढविण्यावर महापालिकेचा भर आहे. स्वच्छ, सुंदर आणि निरोगी पिंपरी चिंचवडसाठी प्रत्येक नागरिकाने स्वच्छतेची जबाबदारी स्वीकारावी.”— डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका
“स्वच्छ आणि निरोगी शहरासाठी नागरिकांनी दैनंदिन जीवनात स्वच्छतेच्या सवयी रुजविणे आवश्यक आहे. कचऱ्याचे योग्य विलगीकरण करून तो महापालिकेच्या कचरा संकलन यंत्रणेकडेच देणे आणि परिसर स्वच्छ ठेवणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.”— डॉ. प्रदीप ठेंगल, उप आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका
अभियानाच्या माध्यमातून नागरिक सहभाग वाढवून ‘स्वच्छ शहर, निरोगी शहर’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेकडून विविध अभिनव उपक्रम प्रभावीपणे राबवले जात आहेत.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
