22
दापोडीत घरगुती सिलेंडरमधून गॅस चोरीचा पर्दाफाश; प्रत्येक टाकीत ४ ते ५ किलो गॅस कमी, कामगाराला अटक!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, दि. २४ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
दापोडी (पिंपरी): दापोडी परिसरातील हिंदुस्तान पेट्रोलियमच्या बी. डी. खांदवे गॅस एजन्सीच्या डिलिव्हरी कामगाराकडून तब्बल ३५ घरगुती गॅस सिलेंडरमधून बेकायदेशीर व अत्यंत धोकादायक पद्धतीने प्रत्येकी ४ ते ५ किलो गॅस काढून ग्राहकांची फसवणूक करण्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. या कारवाईत पोलिसांनी ४५ गॅस सिलेंडरसह एक टेम्पो जप्त केला असून चालक कामगाराला बेड्या ठोकल्या आहेत.
दापोडी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हा गॅस चोरीचा प्रकार सुरू असल्याची माहिती ‘छावा’ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष धनाजी येळकर पाटील यांना मिळाली होती. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता, गॅस सिलेंडरचे सील तोडून बेकायदेशीरपणे गॅस रिफिलिंग केला जात असल्याचे उघड झाले. सर्वसामान्य ग्राहकांची उघडपणे फसवणूक होत असल्याचे दिसताच येळकर पाटील यांनी तात्काळ ११२ (मार्शल) वर संपर्क साधला.
माहिती मिळताच मार्शल पथक काही मिनिटांतच दाखल झाले. त्यानंतर वैध मापन शास्त्र (वजने व मापे) विभागाचे अधिकारी आदेश गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक राहुल पाटील, डी. व्ही. बोराडे व त्यांच्या पथकाने वाहनावरील सर्व सिलेंडरचे वजन केले असता, प्रत्येक सिलेंडरमध्ये नियमापेक्षा ४ ते ५ किलो वजन कमी असल्याचे आणि सील तुटलेल्या स्थितीत असल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणी पोलीस शिपाई राजेंद्र बबन गरजे यांच्या फिर्यादीवरून आरोपी चालक श्यामलाल मामराज बिश्नोई (वय २०, रा. वडगाव शिंदे, पुणे; मूळ रा. जोधपूर, राजस्थान) याच्याविरुद्ध जीवनावश्यक कायदा १९५५ अन्वये दापोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस पंचनाम्यात ३ लाख रुपये किमतीचा महिंद्रा पिकअप टेम्पो (क्र. KA 51 GA 7024) आणि १ लाख ५३ हजार रुपये किमतीचे एचपी कंपनीचे भरलेले व रिकामे असे एकूण ४५ गॅस सिलेंडर, असा एकूण ४ लाख ५३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
“गॅस चोरीमुळे नागरिकांची आर्थिक फसवणूक तर होतेच, शिवाय गॅस अत्यंत ज्वलनशील असल्याने असे बेकायदेशीर रिफिलिंग अत्यंत धोकादायक आहे. यात स्फोट होऊन मोठी जीवितहानी होऊ शकते, यापूर्वी अशा घटनांत निष्पाप लोकांचे बळी गेले आहेत. त्यामुळे केवळ डिलिव्हरी बॉयवर कारवाई करून न थांबता, संबंधित गॅस एजन्सी मालक आणि एच.पी. कंपनीच्या बेजबाबदार अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई झाली पाहिजे; अन्यथा ‘छावा’ संघटना आक्रमकपणे रस्त्यावर उतरेल.”— धनाजी येळकर पाटील (संस्थापक अध्यक्ष, छावा संघटना)
दरम्यान, गॅस चोरीच्या या गंभीर घटनेबाबत बी. डी. खांदवे एच.पी. गॅस एजन्सीच्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, कर्मचाऱ्यांनी मालकाचा संपर्क क्रमांक देण्यास आणि या विषयावर बोलण्यास पूर्णपणे टाळाटाळ केली.
या कारवाईच्या वेळी छावा संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष गोरख पाटील, रावसाहेब गंगाधरे, अंगद जाधव, अश्विनी पाटील, हेमा ग्यानी, अपर्णा देशमुख, प्रतीक्षा गंगावणे, संतोष लाखे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
