14
विद्यार्थ्यांनी रेखाटला ‘स्वप्नातला भारत’; भारतीय जैन संघटनेच्या शाळेत चित्रकला उपक्रमाचे यशस्वी आयोजन!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. २६ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभर राबविण्यात आलेल्या ‘स्वप्नातला भारत’ या उपक्रमांतर्गत भारतीय जैन संघटनेच्या शाळेत विद्यार्थ्यांसाठी विशेष चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय जनता पार्टी (भाजपा) संत तुकाराम नगरच्या वतीने आयोजित हा उपक्रम प्रसिद्ध कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांच्या वाढदिवसाचे (दि. २६ सप्टेंबर) औचित्य साधून पार पडला.
या कार्यक्रमात शेकडो विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपल्या कल्पनेतील विकसित, प्रगत आणि सक्षम भारत चित्रांच्या माध्यमातून कागदावर रेखाटला. याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि यशवंतभाऊ भोसले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सहभागी विद्यार्थ्यांना लाडू, चिवडा व अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कामगार नेते यशवंतभाऊ भोसले म्हणाले, “उद्याचा समृद्ध भारत म्हणजेच तुम्ही सर्व विद्यार्थी आहात. भारताचे नाव जागतिक स्तरावर अधिक उंचावण्यासाठी विद्यार्थ्यांनी आतापासूनच मोठी ध्येये ठेवली पाहिजेत. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला जगाच्या पाठीवर एक नवी आणि मजबूत ओळख मिळवून दिली आहे. त्याचप्रमाणे तुम्हीही भविष्यात मोठे होऊन आपल्या कर्तृत्वाने देशाची मान जगात उंच करा.”
यावेळी त्यांनी विशेषतः इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना आगामी बोर्ड परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच भाजप कोअर कमिटी सदस्य सदाशिवराव खाडे, माजी नगरसेविका तथा भाजप महिला मोर्चाच्या पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षा सुजाताताई पालांडे आणि शाळेचे प्राचार्य देशमुख सर यांनी यशवंतभाऊ भोसले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले.
या कार्यक्रमास शाळेचे प्राचार्य देशमुख सर, उपप्राचार्य जाधव सर, यादव सर, भाजप कोअर कमिटी सदस्य सदाशिवराव खाडे, पिंपरी-चिंचवड शहर महिला मोर्चा अध्यक्षा सुजाताताई पालांडे यांच्यासह मंगेश धाडगे, महेंद्र बाविस्कर, अभय फाळके, राहुल खाडे, अमोल घोरपडे, दीपक पाटील, दिनेश पाटील, जयदेव अक्कलकोटे, तात्याराव गायकवाड, राहुल शितोळे यांसह अनेक कार्यकर्ते व शिक्षक उपस्थित होते.
‘स्वप्नातला भारत’ या संकल्पनेतून विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला नवे व्यासपीठ मिळवून देण्यासोबतच देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी नव्या पिढीमध्ये देशभक्ती आणि सकारात्मक विचार रुजविण्याचा महत्त्वाचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.


