news
Home अमरावती धावपळीच्या युगात आष्ठोलीतील तरुणीची पर्यावरणपूरक गणेशभक्ती; स्वहस्ते घडवली बाप्पाची देखणी मूर्ती!

धावपळीच्या युगात आष्ठोलीतील तरुणीची पर्यावरणपूरक गणेशभक्ती; स्वहस्ते घडवली बाप्पाची देखणी मूर्ती!

शिक्षिका पूर्वा अढाऊ यांच्या कलेची संपूर्ण मोर्शी तालुक्यात चर्चा; नातीच्या कौतुकाने आजीच्या डोळ्यात आनंदाश्रू | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

आष्ठोलीच्या मातीतून जन्मली सरस्वती: शिक्षिका असूनही जपली गणेशभक्तीची कला!

अमरावती प्रतिनिधी जयकुमार चर्जन, दि. २६ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

अमरावती: सध्याच्या धावपळीच्या आणि रेडिमेडच्या युगात जिथे बाजारातून प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या (PoP) मूर्ती आणण्याकडे लोकांचा कल वाढला आहे, तिथे अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील आष्ठोली सारख्या छोट्या गावातील एका उच्चशिक्षित तरुणीने स्वतःच्या शेतातील मातीतून साक्षात गणपती बाप्पाची देखणी आणि पर्यावरणपूरक मूर्ती साकारून समाजात एक नवा आदर्श निर्माण केला आहे.

आष्ठोली येथील रहिवासी कु. पूर्वा मनोहरराव अढाऊ यांनी MSc, BEd पर्यंतचे उच्च शिक्षण पूर्ण केले असून, सध्या त्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पब्लिक स्कूल, कोळवी’ येथे शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. शिक्षिका म्हणून ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत असतानाच, त्यांनी आपल्या संस्कृतीशी आणि कलेशी असलेली नाळ कायम जपली आहे. दरवर्षी त्या स्वतःच्या हाताने शेतातील मातीची गणेशमूर्ती घडवतात. या कार्यात त्यांचा धाकटा भाऊ रुद्रेश अढाऊ हा नेहमी खारीचा वाटा उचलत त्यांना मोलाची मदत करतो.

आजच्या विभक्त कुटुंब पद्धतीच्या काळात आष्ठोली येथील अढाऊ परिवाराने संयुक्त कुटुंबाची परंपरा अतिशय गुण्यागोविंदाने जपली आहे. पूर्वा यांच्या या उपक्रमामागे त्यांचे वडील मनोहरराव अढाऊ, आई सविता मनोहरराव अढाऊ, आजोबा रावसाहेब साहेबराव अढाऊ, गजानन साहेबराव अढाऊ, बाबासाहेब साहेबराव अढाऊ यांच्यासह भाऊ सागर, अंकुश, श्रीकेश, रुद्रेश आणि आदर्श या संपूर्ण संयुक्त कुटुंबाचा भक्कम पाठिंबा आहे.

पूर्वा यांच्या या अद्वितीय कलेची दखल घेत ‘युवा फाउंडेशन’चे संस्थापक अध्यक्ष गजानन चौधरी, ‘क्रांतिकारी शेतकरी संघटने’चे अमितभाऊ अढाऊ व गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी थेट पूर्वा यांच्या घरी जाऊन शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि मानाचे सन्मानचिन्ह देऊन त्यांचा भावूक वातावरणात गौरव केला.
यावेळी नातीचा हा सत्कार पाहून पूर्वा यांची आजी इंदिराबाई साहेबराव अढाऊ यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. “शिक्षणासोबतच आपली कला आणि संस्कृती जपणारी पूर्वा हीच आपल्या आष्ठोली गावाची खरी संपत्ती आहे,” अशा शब्दांत उपस्थितांनी तिचे कौतुक केले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!