मुंबई (मॅक्स मंथन डेली न्यूज): पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढणारे मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रात अमित ठाकरे यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शस्त्रसंधीनंतर देशभरात काढल्या जाणाऱ्या तिरंगा यात्रा आणि जल्लोषाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. “आपण युद्धात विजय मिळवलेला नाही, तर हा केवळ युद्धविराम आहे. त्यामुळे देशभरात सुरु असणारा हा जल्लोष मनाला वेदना देणारा आहे,” अशी खंत अमित ठाकरे यांनी पत्रात व्यक्त केली आहे. या पत्रावर आता भाजपच्या गोटातून काय प्रतिक्रिया येणार, हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.
अमित ठाकरेंच्या पत्रातील महत्त्वाचे मुद्दे:
- “ऑपरेशन सिंदूर’मध्ये भारतीय जवानांनी दाखवलेले धाडस, शिस्त, समर्पण आणि राष्ट्रासाठीचा त्याग हा संपूर्ण देशासाठी अभिमानास्पद आणि गौरवास्पद आहे.
- “सध्या काही ठिकाणी विजयाचं प्रतीक म्हणून जे उपक्रम राबवले जात आहेत, त्याबाबत समाजात भावनिक संभ्रम आहे. ही परिस्थिती विजयाची नसून ‘ceasefire’ (युद्धविराम) आहे.”
- “ज्या घटनेत आपल्या शूर जवानांनी प्राणत्याग केला, त्याच काळात साजरे होणारे उत्सव अनेकांच्या मनाला वेदना देणारे आहेत.”
- “शहिद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांसाठी दीर्घकालीन कल्याणकारी उपायांची गरज आहे, आणि या बलिदानाच्या पार्श्वभूमीवर समाज म्हणून आपण अधिक संवेदनशील राहण्याची आवश्यकता आहे.”
- “पहलगाममध्ये घडलेला क्रूर दहशतवादी हल्ला, ज्यामध्ये २६ निरपराध पर्यटकांनी आपला जीव गमावला, त्या अतिरेक्यांविरुद्ध ठोस आणि निर्णायक कारवाई होणे हीच खरी जनभावना आहे.”
- “पाकिस्तानच्या गतइतिहासाचा विचार करता त्यांच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवणे कठीण आहे. त्यांनी यापूर्वीही अनेकवेळा अशाच संधींमध्ये दगाफटका केलेला आहे. त्यामुळे अशा स्थितीत समाजातील नागरिकांना सजग ठेवणे, युद्धजन्य परिस्थितीत त्यांना काय करावे याचे मार्गदर्शन करणे, आणि त्यांची मानसिक तयारी घडवून आणणे हेही सरकारच्या धोरणाचा महत्त्वाचा भाग ठरायला हवा.”
- “युद्धाचा निकाल अजून स्पष्ट नसताना विजयाचा जल्लोष टाळावा, आणि देशासाठी शहीद झालेल्या वीरांना खरी श्रद्धांजली म्हणून या काळात संयम बाळगावा.”
अमित ठाकरे यांच्या या पत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप काय प्रतिक्रिया देतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.