मूर्तिजापूरजवळ सालतवाडा येथे हृदयद्रावक घटना: विद्युत तारेच्या धक्क्याने ३ म्हशींचा मृत्यू, शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान!
काटेपूर्णा नदीकाठी घडली दुर्घटना; महावितरण कंपनीकडून पंचनामा, शेतकऱ्याने केली मदतीची आर्त विनंती!
मूर्तिजापूर (अकोला)प्रतिनिधी: विलास सावळे, दि. २५ जून २०२५ (मॅक्स मंथन डेली न्यूज): अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातून एक हृदयद्रावक आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. आज (बुधवार, २५ जून) सालतवाडा गावाजवळ काटेपूर्णा नदीकाठी विद्युत तारेचा शाॅक लागून अल्पभूधारक शेतकरी तेजराव पंढरी नागे यांच्या तीन म्हशींचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे नागे यांचे अंदाजे ४ ते ५ लाख रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे.

नेमकी काय घडली घटना?
तेजराव नागे हे आज दुपारी ३ ते ४ वाजेच्या सुमारास आपल्या म्हशींना गावालगतच्या काटेपूर्णा नदीकाठी चारण्यासाठी घेऊन गेले होते. याच दरम्यान, तीन म्हशी पाणी पिण्यासाठी नदीत उतरल्या. नदीत उतरताच त्या तडफडत असल्याचे मालकाच्या लक्षात आले. म्हशींना वाचवण्यासाठी ते जवळ जात असताना, त्यांना नदीत तुटलेली विद्युत तार दिसली. त्यांनी आरडाओरड केली, परंतु मदतीसाठी जवळपास कोणीही नव्हते.
चालू विद्युत वाहिनीची तार नदीत तुटून पडल्यामुळे पाण्यामध्ये वीजेचा प्रवाह (करंट) पसरला होता. यामुळे म्हशींना विजेचा तीव्र धक्का लागून त्या तडफडून जागीच मरण पावल्या. ही घटना इतकी भयानक होती की, नदीकिनारी केवळ म्हशीच नव्हे, तर साप, मासे आणि कासवही मृतावस्थेत पडलेले आढळले.

महावितरणकडून पंचनामा, शेतकऱ्याची मदतीची याचना
या घटनेची माहिती मिळताच महावितरण कंपनी, मूर्तिजापूरचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पंचनामा केला. जीव वाचवण्याच्या प्रयत्नात असलेल्या आपल्या म्हशी डोळ्यासमोर तडफडून मरताना पाहून हताश झालेल्या शेतकरी तेजराव नागे यांनी, “आमचे झालेले नुकसानाची भरपाई देण्यात यावी,” अशी आपल्या रडक्या आवाजात शासनाला विनंती केली आहे.
या घटनेमुळे सालतवाडा आणि परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. महावितरणने तातडीने तुटलेल्या तारांची दुरुस्ती करावी आणि अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून केली जात आहे. शेतकऱ्याला तातडीने योग्य नुकसान भरपाई मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
