पिंपरी-चिंचवडच्या ‘डीपी’ आराखड्याविरोधात जनआक्रोश मोर्चा: रहाटणी, थेरगाववासीयांचा तीव्र एल्गार!
‘प्रॉपर्टी कार्ड द्या, घरांवरील आरक्षणे रद्द करा’: मुख्यमंत्र्यांनी चऱ्होलीला वेगळा, आम्हाला वेगळा न्याय का? – ‘स्वाभिमानी घर बचाव’चा सवाल; नेत्यांना ‘गावबंदी’चा इशारा!
पिंपरी-चिंचवड, दि. ३० जून २०२५: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने रहाटणी, थेरगाव, वाल्हेकरवाडी, चिंचवडेनगर आणि बिजलीनगर येथील रहिवासी घरांवर टाकलेल्या प्रस्तावित विकास आराखड्याच्या (डीपी) विरोधात आणि बाधित रहिवासी घरांना तात्काळ प्रॉपर्टी कार्ड मिळावे, या मागणीसाठी आज (सोमवार, ३० जून) ‘स्वाभिमानी घर बचाव संघर्ष चळवळी’च्या माध्यमातून नागरिकांनी एकत्र येत चिंचवड स्टेशन ते महापालिका भवन असा भव्य जन आक्रोश मोर्चा काढला. महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी या तीव्र भावनांची दखल घ्यावी, असा इशारा आंदोलकांनी दिला.

‘२५ हजारांहून अधिक हरकती; तरीही DP रद्द नाही!’
या प्रस्तावित विकास आराखड्यास २५ हजारांपेक्षा अधिक नागरिकांनी हरकती घेतल्या आहेत आणि आणखी हरकती घेतल्या जात आहेत. नागरिकांचा इतका मोठा विरोध असतानाही हा डीपी रद्द केला गेला नाही, यामुळे येथील नागरिकांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि स्थानिक लोकप्रतिनिधी, आमदारांबाबत मोठा रोष निर्माण झाला आहे.
अलीकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरात संतपीठ व विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन केले. यावेळी बोलताना, शेतकऱ्यांच्या व नागरिकांच्या विरोधात जाऊन कोणताही विकास प्रकल्प राबवला जाणार नाही, अशी घोषणा त्यांनी केली होती. चऱ्होली येथील ‘टीपी’ (टाऊन प्लॅनिंग) योजना शेतकरी आणि नागरिकांच्या विरोधामुळे, तसेच आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्यामुळे रद्द करण्याच्या सूचना आयुक्त शेखर सिंह यांना देऊन ती रद्द केली. मग त्याच महापालिका क्षेत्रातील रहाटणी, थेरगाव, वाल्हेकरवाडी, चिंचवडेनगर, बिजलीनगर येथील रहिवासी घरांवर ३० मीटर रिंग रेल्वे रोड, १५, २४ मीटर रस्त्यांसह विविध प्रकारची आरक्षणे असताना आणि त्याला रहिवाशांचा मोठा विरोध असताना हा डीपी मात्र रद्द का केला जात नाही, असा सवाल आंदोलकांनी उपस्थित केला.

नेत्यांना भूतकाळातील ‘रोषा’ची आठवण: ‘फक्त निवडणुकीसाठी भांडवल नको!’
‘स्वाभिमानी घर बचाव चळवळी’चे मुख्य समन्वयक धनाजी येळकर पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर थेट निशाणा साधला. “महाराष्ट्राचे मुख्यमंत्री चऱ्होलीसाठी वेगळा न्याय आणि आमच्यासाठी वेगळा न्याय कसे देऊ शकतात?” असा प्रश्न त्यांनी विचारला. या रहिवाशांच्या घरांवर टाकलेल्या आरक्षणास आमदार शंकर जगताप यांची ‘मूक संमती’ दिसत असल्याचा आरोपही येळकर पाटील यांनी केला. “अन्यथा महेश लांडगे यांच्यासारखा पाठपुरावा करून त्यांनी हा डीपी रद्द केला असता. जनतेला खोटी आश्वासने देऊन त्यांनी वेड्यात काढू नये, जनता आता हुशार झाली आहे,” असे पाटील म्हणाले.
याच प्रश्नासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पूर्वी ‘रॉंग साईडने’ जावे लागले होते, तर तत्कालीन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या सभेतही खूप गोंधळ झाला होता. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनाही सभेतून पोलीस बंदोबस्तात काढता पाय घ्यावा लागला होता. “मग एवढा विरोध असतानाही या नागरिकांच्या मागण्यांचा विचार केला जात नाही. फक्त निवडणुकीसाठी या मुद्द्यांचे भांडवल केले जाते,” अशी खंत येळकर पाटील यांनी व्यक्त केली.

‘निवारा हक्क संवाद यात्रा’ ते ‘विधानभवना’वर मोर्चाचा इशारा!
धनाजी येळकर पाटील यांनी सांगितले की, ‘निवारा हक्क संवाद यात्रा’ ही महापालिका प्रशासन आणि फडणवीस सरकार विरोधातील संघर्ष यात्रा आहे. “या आठवड्यात डीपी रद्द नाही केल्यास आंदोलन आणखी तीव्र करून वेळ पडल्यास विधानभवनावर मोर्चा काढू. थेरगाव, वाल्हेकरवाडी, चिंचवडेनगर, बिजलीनगर कडकडीत बंद ठेवत आज महापालिकेवर नागरिकांच्या वतीने जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे,” असे पाटील म्हणाले.
“डीपी रद्द करून, रहिवाशांच्या प्रॉपर्टी कार्डचा प्रश्न न सुटल्यास नेत्यांना गावबंदी सुद्धा करू, मंत्र्यांचे कार्यक्रम होऊ देणार नाही,” असाही इशारा यावेळी धनाजी येळकर पाटील यांनी दिला. तसेच, “पावसाळी अधिवेशनात आमदारांनी या प्रश्नावर लक्षवेधी मांडली पाहिजे अन्यथा मागील आमदारासारखेच हे आमदार सुद्धा आमच्या घराचे राजकारण करतात हे स्पष्ट होईल. त्यावेळी मात्र त्यांच्या घरासमोर आणि कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन करण्यात येईल,” असेही पाटील यांनी बजावले. पीएमआरडीएचा प्रस्तावित विकास आराखडा मुख्यमंत्री रद्द करू शकतात, तर लोकांची घरे उद्ध्वस्त करणारा विकास आराखडा त्यांनी रद्द करावा, की हा चिंचवडच्या लोकप्रतिनिधीला का हवा आहे? म्हणत त्यांनी टीका केली.
मोर्चामध्ये प्रमुख समन्वयकांसह हजारो नागरिकांचा सहभाग
यावेळी घर बचाव संघर्ष चळवळीचे मुख्य समन्वयक धनाजी येळकर पाटील, शिवाजी इबीतदार, माजी नगरसेवक सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष प्रवीण कदम, सतीश काळे, कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे, मराठवाडा जनविकास संघाचे अरुण पवार, ज्योती निंबाळकर, अजीज शेख, छावा युवा संघटना प्रदेशाध्यक्ष वैभव जाधव,मनोज पाटील, देवेंद्र भदाणे, रामचंद्र ढेकळे, सतीश नारखेडे, गौरव धनवे, राजू पवार, शिवाजी पाटील, संदीप भालके, शशिकांत आवटे, अरुण पवार, किशोर पाटील, राजश्री शिरवळकर, बालाजी ढगे, जुलेखा दफेदार, नयना नारखेडे, ज्योती भालके, यशोदा पवार, अश्विनी पाटील, पल्लवी साळुंखे, फरिदा कुरणे, इरफान शेख, विद्या पंडित, रवींद्र दळवी, रामलिंग तोडकर, गणेश सरकटे पाटील, रावसाहेब गंगाधरे, संजय जाधव, मारुती निंबाळकर, निशा काळे, नीलम सांडभोर, तोफिक पठाण, देवेंद्र खोकर, रामलिंग तोडकर या समन्वयकांसह हजारो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
