रहाटणीत न्यू सिटी प्राईड स्कूलमध्ये ग्रंथदिंडी व निर्मलवारीचा उत्साह!
चिमुकल्या वारकऱ्यांनी वेधले लक्ष; ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या गजरात परिसर भक्तिमय, पर्यावरण संवर्धनाचाही संदेश!
रहाटणी, दि. ०५ जुलै २०२५: क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले एज्युकेशन फाउंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आषाढी वारीनिमित्त आयोजित करण्यात आलेली ग्रंथदिंडी आणि निर्मलवारी मोठ्या भक्तीभावाने आणि उत्साहात पार पडली. या अनोख्या उपक्रमामुळे शाळेतील विद्यार्थ्यांनी पारंपरिक वारकरी परंपरेचा अनुभव घेतला, तसेच पर्यावरण संवर्धनाचा संदेशही दिला.
चिमुकल्या वारकऱ्यांचा उत्साह आणि हरिनामाचा गजर
यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी वारकऱ्यांचा वेश परिधान केला होता. डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन विठूनामाचा जयजयकार करणाऱ्या विद्यार्थिनी, तर गळ्यात टाळ अडकवून ‘ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली’ म्हणत दिंडीत सहभागी झालेले विद्यार्थी उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते. ‘ज्ञानबा-तुकाराम’चा जयघोष आणि हरिनामाच्या जयजयकाराने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता.
संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार यांच्या हस्ते दिंडी आणि ग्रंथपूजन करण्यात आले. यावेळी शाळेचे उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत यांच्यासह सामाजिक, शैक्षणिक व आध्यात्मिक क्षेत्रातील अनेक मान्यवर, तसेच पालक, विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पर्यावरण आणि समाज प्रबोधनाचा संदेश
या दिंडी सोहळ्यात केवळ भक्तीभावाचेच नव्हे, तर सामाजिक आणि पर्यावरणीय संदेशही देण्यात आले. विद्यार्थ्यांनी “झाडे लावा झाडे जगवा” अशा घोषणा देत पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून दिले. ‘तुकाराम, ज्ञानेश्वर, विठ्ठल रुक्माई’ अशा विविध संतांच्या वेशभूषेत आलेले विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते.
नाट्यमय सादरीकरण आणि पसायदान
शाळेपासून शिवार चौकातून परत शाळेत आलेल्या या दिंडीनंतर, वारकरी पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला का जातात, याचे नाट्य स्वरूपात सादरीकरण करण्यात आले. वैष्णवधर्म हा समाज प्रबोधनाचा आहे आणि सर्व संतांनी चांगला व सत्याचा मार्ग दाखवला, याची अनेक उदाहरणे विद्यार्थ्यांना नाटकातून सादर केली. “भारुड आणि अभंगाचे” सादरीकरण पाहून उपस्थितांचे मन भरवून गेले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना संतांचे महात्मे कळतात आणि त्यांच्या जीवनातून प्रेरणा मिळते.
अमित फुलावळे, रुद्र शिंदे, विशाखा सकट, सार्थक ननवरे यांनी अभंग म्हटले, त्यानंतर सारिका देशमुख यांनी ‘पसायदान’ केले. तसेच, हृदय रोटे, गुंजन चौधरी, ईश्वरी नाईक, प्रांजल झांबरे, मंथन जाधव, श्लोक गायकवाड, विधी शिनगारे, एंजल परिवार यांनी संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्याविषयी माहिती दिली. स्वाती वक्ते, गीतांजली दुबे, डिंपल काळे या शिक्षकांनी दिंडीविषयी माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ओम काळे आणि मोहित गायकवाड यांनी केले, तर आभार स्नेहल घडशी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. या आगळ्यावेगळ्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये धार्मिक आणि सामाजिक मूल्यांची रुजवात झाली.
© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
