पर्यावरणाचे दूत व्हा! – जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांचे विद्यार्थ्यांना आवाहन
अमरावतीमध्ये ‘एक पेड माँ के नाम’ अभियानांतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न
अमरावती, प्रतिनिधी विजय यावले,मॅक्स मंथन डेली न्यूज दि. १ ऑगस्ट २०२५: संतांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमरावती जिल्ह्यात, संत गाडगे महाराज आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी दिलेल्या पर्यावरण संवर्धनाच्या संदेशाचे पालन करून, प्रत्येकाने पर्यावरणाचे दूत म्हणून काम करावे असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले. नांदगाव पेठ औद्योगिक परिसरात आयोजित केलेल्या भव्य वृक्षारोपण कार्यक्रमात ते बोलत होते. विशेषतः विद्यार्थ्यांनी या कार्यात पुढाकार घ्यावा असे ते म्हणाले.
हरित महाराष्ट्रासाठी ‘एक पेड माँ के नाम’

जिल्हाधिकारी येरेकर यांनी पर्यावरणाच्या संरक्षणाची गरज अधोरेखित केली. वातावरणातील बदलांमुळे निर्माण झालेल्या गंभीर प्रश्नांवर मात करण्यासाठी राज्य शासनाने ‘हरित महाराष्ट्र’ हा उपक्रम हाती घेतला आहे. पर्यावरणाचे रक्षण करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.
याच अनुषंगाने, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशपातळीवर सुरू केलेल्या ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमाची माहिती त्यांनी दिली. या आवाहनानुसार, प्रत्येकाने एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याची प्रतिज्ञा घ्यावी असे त्यांनी सांगितले.
आमदार वानखडे यांचे एक लाख झाडे लावण्याचे आवाहन

कार्यक्रमात उपस्थित आमदार राजेश वानखेडे यांनी आईच्या स्मरणार्थ झाड लावण्याच्या या उपक्रमात नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, वृक्षारोपणामुळे पर्यावरण संतुलित राहण्यास मदत होते. केवळ झाडे लावल्याने निसर्गातील सर्व बाबींचे संतुलन आपोआप साधले जाते. याच विचाराने जिल्ह्यात एक लाख झाडे लावण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यांनी नागरिकांना या उपक्रमास सहकार्य करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमात मान्यवरांची आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती

या कार्यक्रमात मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी राम लंके, विभागीय वन अधिकारी दर्शना पाटील, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
भारतीय महाविद्यालय, स्व. दत्तात्रय पुसदकर कला महाविद्यालय, प्रा. राम मेघे अभियांत्रिकी महाविद्यालय, हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, शारीरिक शिक्षण महाविद्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, तक्षशिला महाविद्यालय, राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते वृक्षपूजनाने झाली, त्यानंतर उपस्थित मान्यवर आणि विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण केले. सहभागी विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात प्रमाणपत्रे देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
हा कार्यक्रम महसूल विभाग, सामाजिक वनीकरण, कृषी विभाग, अमरावती महापालिका, रास्तभाव दुकानदार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निरीक्षण अधिकारी चैताली यादव यांनी केले तर आभार अनिल भटकर यांनी मानले.
© 2025 मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
