मराठा आरक्षण, शेतकरी कर्जमाफी आणि वाढत्या गुन्हेगारीवर ‘अखिल भारतीय छावा संघटने’चा आक्रमक पवित्रा
‘संतभूमीतील वेश्याव्यवसाय तात्काळ बंद करा’; केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांचा राज्य सरकारला इशारा
१९ ऑगस्ट २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी, प्रतिनिधी शाम सोनवणे : मराठा आरक्षण, शेतकरी कर्जमाफी आणि पुणे-पिंपरी चिंचवडमधील वाढत्या गुन्हेगारीच्या मुद्द्यांवर अखिल भारतीय छावा संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. काळेवाडी येथे झालेल्या एका मेळाव्यापूर्वी पत्रकार परिषदेत बोलताना संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांनी राज्य सरकारला कठोर शब्दांत इशारा दिला.
मराठा आरक्षणाबाबत सरकारला दिला इशारा
नानासाहेब जावळे पाटील यांनी मराठा समाजाची सद्यस्थिती नाजूक असल्याचे सांगून, त्यांच्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी सरकारने तातडीने मराठा आरक्षण लागू करावे, अशी मागणी केली. ते म्हणाले, “सरकारने मराठा समाजाच्या अन्य मागण्यांवरही त्वरित ठोस निर्णय घ्यावा. मराठा समाज अजूनही शांत आहे, पण आमच्या संयमाची परीक्षा पाहू नये.” मराठा समाजासाठी १०,००० कोटी रुपयांचे आर्थिक विकास महामंडळ तात्काळ कार्यान्वित करण्याची मागणीही त्यांनी केली.
शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफीची मागणी
हवामानातील बदलांमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत, असे सांगत जावळे पाटील यांनी सरकारने शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी जाहीर करण्याची मागणी केली. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आवश्यक धोरणे तातडीने राबवावीत, असे आवाहनही त्यांनी केले.
पुणे-पिंपरीमधील गुन्हेगारीवर टीका
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांमधील वाढत्या गुन्हेगारीवर त्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. विशेषतः, मसाज पार्लरच्या नावाखाली चालणाऱ्या वेश्याव्यवसायावर कठोर कारवाईची मागणी केली. “ज्ञानोबा-तुकोबांसारख्या संतांच्या भूमीत अशा गैरप्रकारांना थारा मिळणे लज्जास्पद आहे,” असे ते म्हणाले. यासोबतच, सामाजिक कार्यकर्त्यांवर होणाऱ्या हल्ल्यांचा निषेध करत त्यांनी याप्रकरणी कडक कायदेशीर कारवाईची मागणी केली.
यावेळी केंद्रीय सहकार्यध्यक्ष भिमराव मराठे, प्रदेश महासचिव मनोज मोरे, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष राम सुर्यवंशी यांच्यासह राज्यभरातून संघटनेचे हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. जावळे पाटील यांनी संघटनेच्या ३० वर्षांच्या लढ्याचा उल्लेख करत, शेतकरी आणि सामान्य माणसाच्या न्यायासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहण्याची ग्वाही दिली.
© 2025 मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
