तंत्रज्ञान क्षेत्रात भारताला जागतिक स्तरावर अनेक संधी: प्रा. राव तुमाला
पीसीसीओईमध्ये दोन आंतरराष्ट्रीय परिषदांचे उद्घाटन; १६ देशांतील संशोधकांचा सहभाग
२३ ऑगस्ट २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:
पुणे – गेल्या काही वर्षांत भारताने विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी प्रगती साधली आहे. नवकल्पना, निर्मिती, उत्पादन आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रभावी वापरामुळे जागतिक स्तरावर तंत्रज्ञान क्षेत्रात भारतासाठी अनेक संधी निर्माण झाल्या आहेत, असे प्रतिपादन मायक्रो इलेक्ट्रॉनिक पॅकिंग इनोव्हेशन्सचे पुरस्कर्ते प्रा. राव तुमाला यांनी केले.
ते पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) संचालित पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पीसीसीओई) येथे नवव्या ‘आयसीसीयुबीईए-२५’ आणि चौथ्या ‘आयमेस-२५’ या दोन आंतरराष्ट्रीय परिषदांच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. ही दोन दिवसांची परिषद ‘संगणन, संप्रेषण, नियंत्रण आणि ऑटोमेशन’ तसेच ‘यांत्रिक अभियांत्रिकीमधील नवकल्पना’ या विषयांवर आयोजित करण्यात आली आहे.

संशोधन आणि नवकल्पनांना व्यासपीठ
या परिषदेसाठी भारतासह १६ परदेशांमधून एकूण १२४० शोधनिबंध आले होते. त्यापैकी २१४ शोधनिबंध ‘आयसीसीयुबीईए’ साठी, तर २६० प्रवेशिकांमधून १२० शोधनिबंध ‘आयमेस’ साठी निवडण्यात आले, अशी माहिती डॉ. जयश्री कट्टी आणि डॉ. नरेंद्र देवरे यांनी दिली.
या परिषदेचा मुख्य उद्देश संशोधकांच्या नवकल्पनांना प्रोत्साहन देणे आणि राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील संशोधकांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा आहे, असे पीसीसीओईचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी सांगितले. ‘तंत्रज्ञानाच्या सहाय्याने समाजाला चांगल्या सेवा मिळाल्या पाहिजेत, यासाठी आयईईई काम करत असून, या परिषदेमुळे विद्यार्थ्यांना भविष्यात मोठा फायदा होईल,’ असे मत आयईईईचे पुणे विभागीय प्रमुख डॉ. अमर बुचडे यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमात परिषदेच्या स्मरणिकेचे प्रकाशनही करण्यात आले. या परिषदेसाठी विविध देशांतील प्रतिनिधी, प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पीसीईटीच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून परिषदेला शुभेच्छा दिल्या.
© 2025 मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
