पर्यावरणपूरक धोरणांमुळे पिंपरी-चिंचवड ‘आदर्श शहर’!
आंध्र प्रदेश शिष्टमंडळ प्रभावित; घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांचा प्रत्यक्ष अभ्यास
२८ ऑगस्ट २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी, प्रतिनिधी शाम सोनवणे – पिंपरी-चिंचवड महापालिकेने घनकचरा व्यवस्थापनात राबवलेल्या पर्यावरणपूरक आणि नाविन्यपूर्ण धोरणांचे अनुकरण करण्यासाठी आंध्र प्रदेश राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ नुकतेच पिंपरी-चिंचवडच्या दौऱ्यावर आले होते. या शिष्टमंडळाने शहरातील विविध प्रकल्पांची पाहणी करून महापालिकेच्या कामाचे तोंडभरून कौतुक केले.
कचरा व्यवस्थापनाचे नाविन्यपूर्ण प्रकल्प
शिष्टमंडळात शिष्टमंडळात तडीपात्री महापालिकेचे आयुक्त एस. शिव रामकृष्णा, विशाखापट्टणम महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. ई. एन. व्ही. नरेशकुमार, कार्यकारी अभियंता के. गुरप्पा यादव, कार्यकारी अभियंता एम. नारायण स्वामी, तांत्रिक तज्ज्ञ श्रीनिवास रेड्डी, वरिष्ठ प्रकल्प सहकारी (सीडीएमए) एम. डी. जावेद आणि प्रकल्प सहकारी (स्वच्छ आंध्र कॉर्पोरेशन) एस. डी. रहतुल्लाह यांचा समावेश होता. यासर्वांना आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह,अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, उपायुक्त सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता हरविंदरसिंग बन्सल, ह क्षेत्रीय कार्यालय सहाय्यक आरोग्य अधिकारी अंकुश झिटे, कनिष्ठ अभियंता दशरथ वाघोले आणि कनिष्ठ अभियंता स्वालीहा मुल्ला यांनी विविध प्रकल्पांची माहिती दिली.
यावेळी, शिष्टमंडळाने दारोदारी कचरा संकलन आणि वर्गीकरण प्रक्रिया, दापोडी येथील शून्य कचरा प्रकल्प, कचरा ट्रान्सफर स्टेशन, मोशी येथील बांधकाम राडारोडा प्रक्रिया प्रकल्प, तसेच बायो मिथिलेशन प्रकल्प यांसारख्या महत्त्वाच्या उपक्रमांची पाहणी केली.
दापोडी येथील शून्य कचरा प्रकल्पात स्थानिक महिलांच्या सहभागातून कचरा गोळा केला जातो. ओल्या कचऱ्याचे खतात रूपांतर केले जाते, तर सुक्या कचऱ्याचा पुनर्वापर केला जातो, हे पाहून शिष्टमंडळ खूप प्रभावित झाले.
‘पिंपरी-चिंचवड एक आदर्श’
विशाखापट्टणम महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. ई. एन. व्ही. नरेशकुमार यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कामाचे कौतुक केले. ते म्हणाले, “पिंपरी-चिंचवड महापालिका ज्या पद्धतीने कचऱ्याचे विभाजन आणि प्रकल्पांची देखभाल करते, तो इतर शहरांसाठी एक आदर्श आहे. येथील पर्यावरणपूरक धोरणे आम्ही विशाखापट्टणममध्येही राबवण्याचा विचार करत आहोत.”
यावर महापालिका आयुक्त शेखर सिंह म्हणाले, “नागरिकांचा सहभाग, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि काटेकोर नियोजन यांच्या जोरावर आज महापालिकेने घनकचरा व्यवस्थापनात एक आदर्श उभा केला आहे.” अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनीही या प्रकल्पांचे यश विविध राज्यांच्या शिष्टमंडळांच्या भेटीवरून सिद्ध होत असल्याचे सांगितले.
© 2025 मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
