आम आदमी पार्टीच्या मीनाताई जावळे यांचे निधन
समाजसेविका आणि कार्यकर्त्यांनी गमावले मार्गदर्शक; राजकीय वर्तुळात शोककळा
३१ ऑगस्ट २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी, प्रतिनिधी शाम सोनवणे – आम आदमी पार्टी (आप) महाराष्ट्र राज्याच्या महिला उपाध्यक्षा आणि पिंपरी चिंचवड शहराच्या अध्यक्षा मीनाताई जावळे यांचे आज सकाळी ७ वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने आप पिंपरी चिंचवड शहर तसेच संपूर्ण राज्यातील पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एक समर्पित मार्गदर्शक आणि समाजासाठी झटणाऱ्या समाजसेविकेला गमावले आहे.
राजकीय आणि सामाजिक योगदानाला आदरांजली
मीनाताई जावळे यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजसेवेत व्यतीत केले. त्या नेहमीच विविध सामाजिक उपक्रमांमध्ये आघाडीवर असत. त्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत होत्या, तसेच जनतेच्या सुखदुःखातही नेहमी सहभागी होत होत्या. त्यांनी आपल्या राजकीय पदांचा उपयोग लोकांसाठी काम करण्यासाठी केला, ज्यामुळे पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्याविषयी आदराची भावना होती. त्यांच्या आकस्मित निधनाने आप पिंपरी चिंचवडला मोठा धक्का बसला आहे, असे पक्षाचे उपाध्यक्ष यशवंत कांबळे यांनी सांगितले.
मीनाताईंच्या राजकीय कारकिर्दी अतिशय प्रामाणिकपणे व प्रकर्षाने व एकनिष्ठ पक्षनिष्ठा दाखवत कार्य केले आहे, त्यांचे पद आणि त्यांनी केलेले कार्य त्यांच्या निष्ठेची साक्ष देतात.
सर्व पिंपरी चिंचवड शहर कार्यकारिणी आणि महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीतर्फे मीनाताई जावळे यांना विनम्र व भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना या कठीण प्रसंगातून सावरण्याचे बळ देवो, हीच प्रार्थना.
© 2025 मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
