पिंपरी चिंचवड शहराच्या मेट्रो विस्तारीकरणाला गती
लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत सविस्तर प्रकल्प अहवालाचे (DPR) सादरीकरण
पिंपरी प्रतिनिधी शाम सोनवणे, ०१ सप्टेंबर २०२५:
पिंपरी चिंचवड शहराच्या वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी मेट्रो विस्तारीकरणाच्या कामाला गती मिळाली आहे. महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. पुणे (महामेट्रो) यांच्यामार्फत तयार करण्यात आलेल्या सविस्तर प्रकल्प अहवालाचे (DPR) सादरीकरण शहरातील लोकप्रतिनिधी आणि महामेट्रोच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत फुगेवाडी येथील मेट्रो कार्यालयात करण्यात आले. यावेळी भक्ती शक्ती चौक – मुकाई चौक, किवळे – भुजबळ चौक, वाकड साई चौक, जगताप डेअरी – कोकणे चौक,, नाशिक फाटा – संत तुकाराम नगर चौक, गवळी माथा चौक, भोसरी डिस्ट्रीक सेंटर, गोडाऊन चौक – चाकण यांसारख्या महत्त्वाच्या मार्गांवर चर्चा झाली.
महत्त्वाच्या सूचना आणि पुढील पाऊले
महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सर्व लोकप्रतिनिधींना प्रकल्पाचे तांत्रिक, आर्थिक आणि कार्यान्वयनाशी संबंधित बाबींची सविस्तर माहिती दिली. या बैठकीत स्थानिक लोकप्रतिनिधींनी काही महत्त्वाच्या सूचनाही मांडल्या. नाशिक फाटा ते भोसरीदरम्यान मेट्रो मार्गिकेची रचना करण्याबाबत विचार करावा, भोसरीतील सध्याचा उड्डाणपूल अडथळा ठरत असल्यास तो काढून टाकावा, तसेच भुजबळ चौक, वाकड येथील दोन्ही मेट्रो मार्गांची रचना प्रवाशांना सोयीस्कर असावी अशा सूचनांचा यात समावेश होता. तसेच, मेट्रो स्टेशनजवळ पुरेशी पार्किंग व्यवस्था करण्याची मागणीही करण्यात आली.
आयुक्तांच्या प्रतिक्रियेतून पुढील दिशा स्पष्ट
या बैठकीनंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सांगितले की, “शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हा प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे. आजच्या बैठकीत लोकप्रतिनिधींनी दिलेल्या सूचनांचा विचार करून पुढील कार्यवाहीसाठी हा प्रकल्प अहवाल लवकरच शासनाकडे पाठवण्यात येईल.”
या बैठकीस विधासभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, खासदार श्रीरंग अप्पा बारणे, विधान परिषद सदस्य उमा खापरे, आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर,पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, एन एच आय चे प्रकल्प संचालक संजय कदम, महा मेट्रो संचालक अतुल गाडगीळ, शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, सहशहर अभियंता बापू गायकवाड, सुनील पवार, माजी महापौर डॉ. वैशाली घोडेकर, माजी स्थायी समिती सभापती सीमा सावळे, माजी नगर सदस्य राहुल कलाटे, शत्रुघ्न काटे, सचिन चिखले यांच्यासह महा मेट्रोचे अधिकारी वर्ग उपस्थित होता.
© 2025 मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
