
मराठीच्या अभिजाततेला व्यवहाराच्या भाषेचे बळ देणे हीच खरी जबाबदारी!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, दि. ०६ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: संत ज्ञानेश्वर यांच्या ओव्यांतील अमृताचे बोल, संत तुकाराम यांच्या अभंगांतील लोकजीवनाचे अंतरंग आणि संत नामदेवांच्या भक्तीपरंपरेने मराठीच्या शब्दांना दिलेली अध्यात्माची उंची… नाणेघाटातील प्रस्तरलेखापासून संतसाहित्य, लोकपरंपरा, बोलीभाषा आणि आधुनिक साहित्यापर्यंतचा मराठीचा प्रवास हा केवळ एका भाषेचा प्रवास नसून महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, विचारविश्वाचा आणि अस्मितेचा प्रवाही प्रवाह आहे. मराठीला मिळालेला अभिजात भाषेचा दर्जा हा या प्रदीर्घ भाषिक परंपरेवर उमटलेला गौरवाचा शिक्का आहे. मात्र हा गौरव केवळ उत्सव आणि सोहळ्यांमध्ये न राहता मराठीला घराघरांत, शाळांमध्ये, प्रशासनात, ज्ञान-विज्ञानात, तंत्रज्ञानात आणि दैनंदिन व्यवहारात जगविणे हीच आजची खरी जबाबदारी आहे, असा सूर ‘मराठी भाषेचा प्रवास’ या परिसंवादातून उमटला.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित ‘अभिजात मराठी भाषा सप्ताहा’च्या तिसऱ्या दिवशी आचार्य अत्रे रंगमंच येथे या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी श्रीकांत चौगुले होते, तर प्रकाश निर्मळ, कैलास भैरट, प्रा. कल्पना क्षीरसागर आणि प्रदीप कदम यांनी मराठीच्या आदिम प्रवाहापासून आजच्या बदलत्या भाषिक वास्तवापर्यंत विविध पैलूंवर विचार मांडले.
या प्रसंगी महापालिकेचे विशेष अधिकारी तथा मराठी भाषा समन्वय अधिकारी किरण गायकवाड यांच्यासह साहित्यिक, अभ्यासक, मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या भाषणात प्रदीप कदम यांनी संतसाहित्यासोबतच छत्रपती शिवाजी महाराजांनी ‘राज्यव्यवहार कोशा’च्या माध्यमातून प्रशासनाच्या व्यवहारात मराठीला दिलेले स्थान हा भाषिक स्वाभिमानाचा सुवर्णअध्याय असल्याचे नमूद केले. ते म्हणाले, “आकाशवाणीच्या काळातील प्रमाण भाषेपासून आजच्या एफएम आणि डिजिटल माध्यमांपर्यंत भाषेचे स्वरूप बदलले आहे. मराठी, हिंदी आणि इंग्रजीचा वाढता संकर ही बदलत्या काळाची वस्तुस्थिती असली, तरी या बदलांकडे केवळ चिंता म्हणून न पाहता नव्या डिजिटल माध्यमांमध्ये मराठीचा प्रभावी आणि सर्जनशील वापर वाढवून तरुण पिढीपर्यंत भाषा पोहोचविण्याची गरज आहे.”
प्रा. कल्पना क्षीरसागर यांनी अर्थशास्त्र आणि तत्त्वज्ञानाच्या अभ्यासासोबत मराठी भाषेचा शास्त्रीय दृष्टिकोनातून वेध घेतला. संतपरंपरेने भाषेला दिलेली भावना व संस्कृतीची श्रीमंती पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी डिजिटल माध्यमे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले.
तसेच वक्त्यांनी मालवणी, वऱ्हाडी यांसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील विविध बोलीभाषांना प्रमाण मराठीच्या समृद्धीचे जिवंत झरे संबोधत, या बोलींनीच भाषेला खऱ्या अर्थाने लोकसंस्कृतीचा सुगंध दिला असल्याचे अधोरेखित केले.
परिसंवादाचे अध्यक्ष श्रीकांत चौगुले यांनी सांगितले की, “भाषेचा प्रवाह हा नदीसारखा असतो. महाराष्ट्राच्या सीमा काळानुसार बदलत गेल्याने कन्नडसह विविध भाषांचा मराठीवर प्रभाव पडला. ज्ञानेश्वरांच्या रचनांमध्येही कन्नड भाषेचा प्रभाव जाणवतो. ‘अण्णा’, ‘आप्पा’ यांसारखे दैनंदिन व्यवहारातील शब्दही भाषिक देवाणघेवाणीतून मराठीत रूढ झाले आहेत.”
पुढे बोलताना चौगुले यांनी आवाहन केले की, “मराठीचे पाईक म्हणून लिहिणे, बोलणे, वाचणे आणि ऐकणे या प्रत्येक कृतीतून भाषेचे जतन करण्याची जबाबदारी आपली आहे. मराठीला अभिजाततेचा मुकुट लाभला आहे, आता त्या मुकुटाला व्यवहारातील वापराचे तेज देण्याची वेळ आली आहे.”
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.









