अतिवृष्टीने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर खासदार प्रणिती शिंदे
पंढरपूर तालुक्यातील पुळुज व विटे गावांची पाहणी; तातडीने सरसकट पंचनामे करण्याचे प्रशासनाला आदेश
पंढरपूर, प्रतिनिधी :- पंडित गवळी २५ सप्टेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:
सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी आज पंढरपूर तालुक्यातील अतिवृष्टी आणि पुरामुळे गंभीरपणे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. संततधार पावसामुळे सोयाबीन, ऊस आणि इतर पिकांचे मोठे नुकसान झाले असून, शेती पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे होत्याचे नव्हते झाले आहे. याच पार्श्वभूमीवर, खासदार शिंदे यांनी पुळुज आणि विटे गावांना भेट देऊन शेतकऱ्यांच्या बांधावर जात त्यांच्या व्यथा ऐकल्या.
शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील अश्रू पाहून खासदार भावूक
सोन्यासारखी उभी असलेली पिके डोळ्यादेखत पाण्यात वाहून गेल्याने शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाले आहेत. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने त्यांच्या चेहऱ्यावरची निराशा स्पष्ट दिसत होती. खासदार शिंदे यांनी चिखलातून वाट काढत प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात जाऊन नुकसानीची पाहणी केली. शेतकऱ्यांशी संवाद साधताना, त्यांच्या डोळ्यातील अश्रू पाहून खासदार शिंदेही भावूक झाल्या. त्यांनी प्रत्येक शेतकऱ्याला धीर देत, “या संकटात शासन तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे,” असे आश्वासन दिले.
‘सरसकट पंचनामे करा’ असा स्पष्ट आदेश
या पाहणी दौऱ्यात खासदार शिंदे यांनी स्थानिक प्रशासनाला कोणत्याही अटी न लावता, कोणत्याही कागदपत्रांची अट न घालता सरसकट पंचनामे करण्याचे स्पष्ट आदेश दिले. पंचनाम्यांच्या अहवालात विलंब झाल्यास शेतकऱ्यांच्या मदत वाटपाला उशीर होऊ शकतो, हे लक्षात घेऊन त्यांनी प्रशासनाला तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. तसेच, या अतिवृष्टीग्रस्तांना शासनाकडून सर्वतोपरी मदत मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू आणि मदत त्यांच्या खात्यात जमा होईपर्यंत पाठपुरावा करत राहू, असे ठोस आश्वासनही त्यांनी दिले. त्यांच्या या भूमिकेमुळे आणि आश्वासनांमुळे पीडित शेतकऱ्यांमध्ये आशेचा किरण निर्माण झाला आहे.
या वेळी त्यांच्यासोबत काँग्रेसचे वरिष्ठ जिल्हा उपाध्यक्ष संदीप पाटील, राजाभाऊ बाबर, माणिक बाबर, जिल्हा काँग्रेस समन्वयक मनोज यलगुलवार, नितीन शिंदे, पांडुरंग ताटे, अरुण पाटील, पंकज गावडे, दत्तात्रय पांढरे, विक्रम पुजारी, अण्णासाहेब पुजारी, महादेव शिंदे, रमेश बाबर यांच्यासह पुळुज व विटे आणि इतर स्थानिक नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते, ज्यांनी शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी होत त्यांना धीर दिला.
© 2025 मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.












