शेतकऱ्यांचा धगधगता एल्गार: विदर्भातून ‘सातबारा कोरा’ करण्यासाठी नागपूरकडे मोर्चा!
बेलोरा येथे हजारो महिलांची उपस्थिती; ‘आत्महत्या नाही, आता हक्कासाठी लढाई’ – राकेश टिकेत, बच्चू कडूंचा सरकारला इशारा
चांदूर बाजार, प्रतिनिधी जयकुमार चर्जन १८ सप्टेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:
विदर्भातील शेतकरी पुन्हा एकदा आपल्या हक्कांसाठी एकवटले आहेत. बेलोरा येथे झालेल्या भव्य शेतकरी-शेतमजूर महिला सभेत देशभरातील दिग्गज शेतकरी नेत्यांनी सरकारवर जोरदार टीका करत आंदोलनाचा इशारा दिला. आता आत्महत्येचा मार्ग सोडून संघर्षाची तयारी ठेवण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
राकेश टिकेत आणि बच्चू कडूंचा निर्धार
राष्ट्रीय किसान मोर्चाचे अध्यक्ष राकेश टिकेत यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “विदर्भातील जनतेत आंदोलनाचा करंट आहे. जर हा करंट सरकारला जाणवला नाही, तर शेतकऱ्यांच्या हक्कासाठी मोठे आंदोलन उभे करावे लागेल.” त्यांनी आमदार बच्चू कडू यांच्या गेल्या सात महिन्यांच्या आक्रमक लढाईचे कौतुक केले. शेतमालाला योग्य हमीभाव मिळेपर्यंत महाराष्ट्रातील प्रत्येक लढाईत आपण त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहू, अशी ग्वाही टिकेत यांनी दिली.
सरकारवर घणाघाती टीका
आमदार बच्चू कडू यांनी सरकारवर टीका करताना म्हटले, “एका दिवसात तेरा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, याचा अर्थ राज्यात शेतकरी हिताचे सरकार नाही. शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या सरकारला जागे करण्यासाठी २८ ऑक्टोबर रोजी नागपूर येथे भव्य आंदोलन होणार आहे.” या लढ्यात महिलांनीही पुरुषांच्या बरोबरीने सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती साठी आणि शेतकऱ्यांच्या हमीभावासाठी प्रहार महिला शेतकरी आघाडीवर सुनीताताई झिंगरे, स्टेला मॅडम, अलकाताई शहाणे, प्रीती गाडगे, लीनाताई गुडदे यांच्यासह हजारो महिला शेतकरी उपस्थित राहिल्या. आंदोलनाच्या पुढील टप्प्यात महिलांची निर्णायक भूमिका राहणार असल्याचे स्पष्ट झाले.
या सभेला डॉ. अशोक ढवळे, महादेव जानकर, ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांच्यासह देशातील अनेक प्रमुख शेतकरी नेते उपस्थित होते.
लढाईचा सातत्यपूर्ण प्रवास
आमदार बच्चू कडू यांनी गेल्या सात महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या कर्जमाफी आणि हमीभावासाठी सातत्याने आंदोलने केली आहेत:
- अमरावतीमध्ये ‘वाडा आंदोलन’
- रायगडमध्ये ‘अन्नत्याग आंदोलन’
- लोकप्रतिनिधींच्या घरासमोर ‘टेंबा आंदोलन’
- मोझरी येथे सात दिवसांचे ‘अन्नत्याग आंदोलन’
- ‘सातबारा कोरा यात्रा’
या आंदोलनांमुळे सरकारवर दबाव वाढत असला, तरी अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष असून, जर त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर नागपूरचे आंदोलन महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवून सोडेल, असा इशारा ‘संयुक्त किसान मोर्चा’ने दिला आहे.
© 2025 मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.



