65
अमरावतीत रा. सू. गवई स्मारक उद्घाटनासाठी सज्ज! – जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी घेतला कामाचा आढावा
३० ऑक्टोबर रोजी होणार भव्य उद्घाटन; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह न्यायमूर्तींची उपस्थिती अपेक्षित
अमरावती, प्रतिनिधी अविनाश वानखेडे, दि. १७ ऑक्टोबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज: ज्येष्ठ नेते आणि माजी राज्यपाल रा. सू. उपाख्य दादासाहेब गवई यांचे भव्य स्मारक अमरावतीमध्ये उद्घाटनासाठी सज्ज झाले आहे. दादासाहेबांचा पुतळा, संग्रहालय आणि सभागृहाचे काम गतीने पूर्णत्वास आले आहे. ३० ऑक्टोबर २०२५ रोजी या स्मारकाचे उद्घाटन नियोजित असून, या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उपस्थित राहणार आहेत, त्यामुळे हा कार्यक्रम भव्यदिव्य होणार आहे.

जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी आज दि. १५ ऑक्टोबर २०२५ स्मारकस्थळी भेट देऊन सुरू असलेल्या कामाची पाहणी केली आणि आवश्यक सूचना दिल्या.
-
मूलभूत सुविधा: उद्घाटन सोहळ्याच्या अनुषंगाने वीज, पाणी आणि स्वच्छतेची कामे प्राधान्याने पूर्ण करण्यात आली आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी वीज वितरण सुरळीत सुरू राहावे आणि पाण्याचा पुरवठा योग्य दाबाने व्हावा यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या.
-
देखभाल आणि सुरक्षा: स्मारकाच्या योग्य देखभालीसाठी येथे तीन व्यक्तींची नेमणूक करण्यात येणार असून, त्या इमारतीची आणि परिसराची देखभाल करतील. तसेच, महापालिकेने दोन पाळीमध्ये चार सुरक्षा रक्षक नेमण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.
-
वाहनतळ व्यवस्थापन: उद्घाटन समारंभाला महत्वाच्या व्यक्ती आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहणार असल्याने, त्यांच्यासाठी वाहनतळाची सुविधा उपलब्ध करावी. तसेच न्यायिक अधिकारी उपस्थित राहणार असल्याने त्यांच्यासाठी स्वतंत्र वाहनतळाची व्यवस्था करण्याचे निर्देश पोलीस विभागाला देण्यात आले.
-
जीवनपट प्रदर्शन: स्मारकाला भेट देणाऱ्या नागरिकांना दादासाहेब गवई यांचा जीवनपट कळावा यासाठी चित्रफिती तयार करण्यात याव्यात, तसेच त्यांच्या उपयोगातील वस्तू येथे ठेवण्यात याव्यात, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
