110
जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनाला प्रकल्पग्रस्तांचा सकारात्मक प्रतिसाद – निम्न पेढी प्रकल्प मार्गी लागणार
घळभरणीच्या कामाला सुरुवात; १५ दिवसांत पूर्ण स्थलांतरणाचे सरपंचांचे आश्वासन
अमरावती, प्रतिनिधी अविनाश वानखेडे, दि. १७ ऑक्टोबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:
निम्न पेढी प्रकल्पामध्ये बाधित झालेल्या गावांचे दर्जेदार पुनर्वसन करण्याच्या जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या आवाहनाला प्रकल्पग्रस्तांच्या सरपंचांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या शासनाने मान्य केल्या असून, घळभरणीला शासनाने मान्यता दिल्याने प्रकल्पाचे काम गतीने सुरू झाले आहे. यामुळे बाधित गावातील नागरिकांनी पुनर्वसित गावात तातडीने स्थलांतरित व्हावे, या जिल्हाधिकाऱ्यांच्या विनंतीला प्रतिसाद देत सरपंचांनी स्थलांतरणाला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज दि. १६ ऑक्टोबर २०२५ निम्न पेढी प्रकल्पाबाबत आढावा घेण्यात आला. यावेळी उपजिल्हाधिकारी श्रद्धा उदावंत, प्रसेनजित चव्हाण यांच्यासह कुंड सर्जापूर आणि अळणगाव येथील प्रतिनिधी निलेश मानकर, गौतम खंडारे, प्रविण तायडे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी पुनर्वसनाच्या कामांची माहिती दिली.
-
आर्थिक मदत: स्थलांतरणासाठी देण्यात येणारा दोन लाख रुपयांचा भत्ता एकरकमी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
-
विकास निधी: पुनर्वसित गावांमधील सोयीसुविधांसाठी ५७ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून, गावाच्या मागणीनुसार इतर योजनांमधून सुविधा उभारण्यात येतील.
-
सोयीसुविधा: पुनर्वसित गावात रस्ते, दिवाबत्तीची सोय करण्यात आली आहे, तसेच १५० घरकुले मंजूर करण्यात आली आहेत.
-
सिंचनाचा फायदा: प्रकल्पामुळे १२ हजार हेक्टर क्षेत्रात सिंचनाची सुविधा होणार आहे. शेतकऱ्यांना शेतामध्ये जाण्यासाठी पर्यायी रस्ते करून दिले जाणार आहेत.
निम्न पेढी प्रकल्पाच्या घळभरणीची परवानगी शासनाने दि. १४ ऑक्टोबर २०२५ रोजी दिली आहे. हे काम फेब्रुवारी २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. येत्या काही दिवसांत प्रकल्पात पाणी साठण्यास सुरुवात होणार असल्याने नागरिकांनी तातडीने स्थलांतरित होण्याच्या सूचना देण्यात आल्या. हा प्रकल्प प्रधानमंत्र्यांच्या प्राधान्याचा प्रकल्प असल्याने यास गती देण्यात आली आहे.
प्रकल्पातील पारदर्शकता आणि विशेष पॅकेजमुळे प्रकल्प मार्गी लागण्यास मदत झाली असल्याचे मत प्रतिनिधींनी व्यक्त केले.
-
निलेश मानकर, कुंड सर्जापूर: खारपाणपट्टा असल्याने शुद्ध पाण्याची सोय करण्यात आली आहे. स्मशानभूमी स्थलांतर आणि ओपन जिमची मागणी मान्य झाली आहे.
-
गौतम खंडारे, अळणगाव: दर्जेदार पुनर्वसनाची कामे गतीने झाली आहेत. स्थलांतरणासाठी दोन लाख रुपयांची रक्कम एकत्र मिळणार असल्याने स्थलांतरणाला सहकार्य करण्यात येईल.
-
सुजाता तायडे, कुंड सर्जापूर: भूखंडांचा लाभ देण्यात येत आहे. कुंड खुर्द, सावरखेड, ततारपूर येथील रस्त्यांचा विषय मार्गी निघाला आहे. येत्या १५ दिवसांत संपूर्ण गावाच्या स्थलांतरणासाठी प्रयत्न करण्यात येतील.


