72
असंघटित कामगारांना ईएसआयसी योजना लागू करा; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे लवकरच बैठक घेण्याचे आश्वासन
तुटपुंज्या वेतनात जीवन जगणाऱ्या घरेलू, फेरीवाला आणि कंत्राटी कामगारांसाठी आरोग्य योजनेची मागणी
पिंपरी प्रतिनिधी शाम सोनवणे, दि. १८ ऑक्टोबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज :
महाराष्ट्र राज्यातील सर्व असंघटित कामगारांना ईएसआयसी (Employees’ State Insurance Corporation) योजना लागू केल्यास त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न सुटू शकेल. ही योजना असंघटित कामगारांसाठी अत्यंत लाभदायी ठरेल, अशी मागणी कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे केली. या मागणीची दखल घेत आरोग्यमंत्र्यांनी याबाबत लवकरच एक बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले.
पिंपरी, दि. १७ ऑक्टोबर २०२५ रोजी प्राधिकरण, निगडी येथे कष्टकरी संघर्ष महासंघ, महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार समन्वय समिती, नॅशनल हॉकर फेडरेशन, महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना स्वतंत्र कृती समिती आणि सारथी चालक-मालक महासंघ यांच्या शिष्टमंडळाने आरोग्यमंत्री श्री. आबिटकर यांची भेट घेऊन निवेदन दिले व सविस्तर चर्चा केली. कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी चर्चेदरम्यान असंघटित कामगारांच्या अडचणी स्पष्ट केल्या.
-
वेतनाची समस्या: असंघटित कामगार, जसे की घरेलू कामगार, फेरीवाले, रिक्षा चालक, सफाई कामगार आणि सुरक्षा रक्षक, यांना मिळणारे वेतन तुटपुंजे असते. त्यांना दैनंदिन खर्च, शिक्षण आणि विशेषतः आरोग्याचा खर्च भागवताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.
-
आरोग्य आणि आर्थिक आधार: ईएसआयसी योजना लागू झाल्यास, कर्ता कामगार आजारी पडला तरी आजारपणातही त्यांना वेतनाच्या स्वरूपात मदत मिळू शकते. तसेच, अपंगत्वासाठी आर्थिक मदत मिळू शकते आणि कुटुंबातील अवलंबित व्यक्तींनाही सहाय्य मिळू शकते.
