अमरावती शहरात नोव्हेंबरमध्ये दर रविवारी वाहतूक नियमांत ‘मोठा’ बदल
वेलकम टी पॉईंट ते बियाणी चौक मार्ग दोन तास राहणार बंद; DCP रमेश धुमाळ यांनी जारी केली अधिसूचना
अमरावती, प्रतिनिधी अविनाश वानखेडे, दि. ११ नोव्हेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:
अमरावती शहरातील वाहतूक व्यवस्थेत नोव्हेंबर २०२५ महिन्यात मोठे आणि तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. शहरवासियांना १६, २३ आणि ३० नोव्हेंबर या तीन दिवसांमध्ये सकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत (दोन तास) वाहतूक नियमांचे पालन करून पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे.
पोलीस उपायुक्त रमेश धुमाळ यांनी यासंदर्भात अधिसूचना जारी केली असून, नागरिकांनी या कालावधीत सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.
नोव्हेंबर २०२५ मधील दर रविवारी (१६ नोव्हेंबर, २३ नोव्हेंबर आणि ३० नोव्हेंबर) रोजी सकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत खालील एकतर्फी मार्ग सर्व वाहनांना वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे:
- वेलकम टी पॉईट कडून बियाणी चौकाकडे येणारा एकतर्फी मार्ग.
ज्या वाहनधारकांना वेलकम टी पॉईंटकडून पुढे जायचे आहे, त्यांना पंचवटी चौक मार्गे वळसा घालून जावे लागणार आहे.
- वाहनधारकांनी वेलकम टी पॉईट ते पंचवटी चौक या मार्गाचा वापर करून तिथून कांता नगर चौक किंवा प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) मार्गाचा वापर करावा.
या नियमावलीतून अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले आहे. त्यामुळे खालील वाहनांना वाहतूक नियमन लागू राहणार नाही:
- रुग्णवाहिका (Ambulances)
- अग्नीशामक वाहन (Fire Tenders)
- कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अत्यावश्यक सेवेची वाहने
याव्यतिरिक्त, वाहतूक परिस्थितीनुसार वाहतूक थांबविणे व वळविणे यासंबंधीचे सर्व अधिकार वाहतूक विभागाकडे तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त (वाहतूक) यांच्याकडे जनहित लक्षात घेऊन अंशतः बदल करण्याचे अधिकार असतील.
ही अधिसूचना नोव्हेंबर २०२५ मधील दर रविवारी प्रायोगिक तत्वावर अंमलात राहील. या अधिसूचनेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालक, वाहनधारकांवर मोटार वाहन अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
