संविधान प्रत्येक भारतीयाला सन्मानाने जगण्याचा हक्क देतं! – अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर
महापालिकेतर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन व सामुहिक संविधान प्रास्ताविका वाचन; लोकभिमुख कामकाजाची ग्वाही
पिंपरी प्रतिनिधी शाम सोनवणे, दि. २७ नोव्हेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:
भारतीय संविधानामुळे आपल्या देशातील नागरिकांना न्याय, समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांची हमी देणारा अमूल्य ठेवा मिळाला आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घडवलेले संविधान प्रत्येक भारतीयाला सन्मानाने जगण्याचा अधिकार देते, त्याचबरोबर अधिकार व कर्तव्यांची जाणीवही करून देते, असे मत अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी व्यक्त केले.
भारतीय संविधान दिनानिमित्त (२६ नोव्हेंबर २०२५) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने मुख्य प्रशासकीय इमारतीसह शहरातील प्रमुख ठिकाणी अभिवादन व सामूहिक संविधान वाचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी सांगितले की, पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनही याच संविधानिक मूल्यांनुसार पारदर्शक, जबाबदार आणि लोकाभिमुख कामकाज करण्यास कटिबद्ध आहे.
या कार्यक्रमास उपायुक्त अण्णा बोदडे, कार्यकारी अभियंता विनय ओहोळ, अभिमान भोसले, विशेष अधिकारी किरण गायकवाड, काॅम्पुटर ऑपरेटर सुरेश तनपुरे यांच्यासह महानगरपालिकेच्या विविध विभागातील कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करून राष्ट्रीय एकात्मता जपण्याचा निर्धार केला. जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी भारतीय संविधान प्रास्ताविकेचे वाचन केले.

या व्यतिरिक्त, पिंपरी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक (भिमसृष्टी) येथेही अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या ठिकाणी अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमात उपस्थित नागरिकांनी संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन केले. यावेळी उपायुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब रोकडे, बापूसाहेब गायकवाड, संतोष जोगदंड, धम्मराज साळवे, संजय बनसोडे, प्रकाश बुक्तर, सुरेश रोकडे, गिरीश वाघमारे, दत्ता खानबीर, राजन नायर, रफिक कुरेशी, दीपक म्हेत्रे, नितीन गवळी, कांचन वाघमारे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
