पिंपरी-चिंचवड शहरात ‘जड’ वाहनांसाठी वेगमर्यादा निश्चित! अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी मोठा निर्णय
डंपर, मिक्सर, हायवासह सर्व अवजड वाहनांना शहरांतर्गत रस्त्यांवर कमाल ३० किमी प्रति तास वेगमर्यादा; पोलीस उप-आयुक्त विवेक पाटील यांचे आदेश
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. ३ डिसेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी-चिंचवड शहरात जड आणि अवजड वाहनांमुळे होणारे अपघात आणि त्यामुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन, पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेने कठोर पाऊल उचलले आहे. वाहतूक सुरळीत करण्यासाठी आणि अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी शहरांतर्गत रस्त्यांवर डंपर, मिक्सर, हायवा आणि इतर तत्सम जड-अवजड वाहनांकरिता कमाल ३० किमी प्रति तास इतकी वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
यासंबंधीची अधिसूचना (Notification) पोलीस उप-आयुक्त, वाहतूक शाखा, विवेक पाटील यांनी दिनांक ०२/१२/२०२५ रोजी निर्गमित केली आहे.
सन २०२३, २०२४ आणि २०२५ सालातील अपघातांचे अवलोकन केले असता, जड-अवजड वाहनांच्या अति वेगामुळे वारंवार होणारे अपघात आणि त्यामुळे निर्माण होणारा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न नियंत्रणात ठेवणे गरजेचे झाले होते.
मोटार वाहन कायदा कलम ११५, ११६(१) (ए) (बी), ११६ (४) आणि ११२ (२) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून पोलीस उप-आयुक्त विवेक पाटील यांनी हे आदेश निर्गमित केले आहेत. यापूर्वीचे काही निबंध असतील, तर ते रद्द करण्यात आले आहेत.
पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील महामार्ग वगळता, महामार्गाचे सेवा रस्ते आणि अंतर्गत रस्त्यांवरून ये-जा करणाऱ्या सर्व जड-अवजड वाहनांना ही वेगमर्यादा लागू राहील.
-
लागू वाहने: डंपर, मिक्सर, हायवा आणि इतर तत्सम जड-अवजड वाहने.
-
कमाल वेगमर्यादा: ३० किमी प्रति तास.
-
वगळण्यात आलेली वाहने: अत्यावश्यक सेवेतील वाहने (उदा. फायरब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहिका इ.) यांना या नियमांमधून वगळण्यात आले आहे.
या अधिसूचनेची अंमलबजावणी दिनांक ०३/१२/२०२५ पासून पुढील आदेशापर्यंत लागू राहील.
© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
