मिशन PCMC साठी इच्छुकांनी लावली अक्षरशः झुंबड! दोन दिवसांत ४१५ हून अधिक उमेदवारी अर्जांचे वितरण
उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सूचनेनंतर ‘कमळ’ चिन्हासाठी मोठी मागणी; शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांचा ‘अब की बार १०० पार’चा नारा कायम
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. ६ डिसेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीचे बिगुल वाजले असून, भारतीय जनता पार्टीकडून (BJP) उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांनी अक्षरशः झुंबड केली आहे. अवघ्या दोन दिवसांत पक्षाच्या मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयातून तब्बल ४१५ हून अधिक इच्छुक उमेदवारांचे अर्ज वितरित करण्यात आले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत उमेदवारीसाठी इच्छुकांची सर्वाधिक पसंती ‘कमळ’ आहे, यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
भाजपा नेते आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुकतीच पिंपळे सौदागर येथे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेतली होती. त्या बैठकीत त्यांनी इच्छुक उमेदवारांनी पक्षाच्या कार्यालयातून अर्ज घ्यावेत, ते जमा करून छाननी व पडताळणी करावी आणि शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी प्रदेश कार्यालयाकडे पाठवावेत, अशा सूचना स्थानिक लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांना दिल्या होत्या.
भाजपाचे संघटन सरचिटणीस मोरेश्वर शेडगे यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, मोरवाडी-पिंपरी येथील भाजपाच्या मध्यवर्ती पक्ष कार्यालयामध्ये शुक्रवारी दुपारी इच्छुक अर्ज वितरणासाठी सुरुवात झाली आणि अवघ्या दोन दिवसांत तब्बल ४१५ हून अधिक उमेदवारांनी अर्ज घेतले आहेत. इच्छुकांसाठी अर्ज घेण्याची मुदत उद्या, रविवार, दि. ७ डिसेंबरपर्यंत आहे.
मोरेश्वर शेडगे यांनी स्पष्ट केले की, भारतीय जनता पार्टीमध्ये निवडणूक इच्छुक अर्ज वितरण, अर्ज स्वीकारणे आणि त्यानंतर पक्षाच्या विविध स्तरावरील सर्व्हेचा आधार घेऊन उमेदवारी निश्चित केली जाते. पक्षश्रेष्ठींचे या संपूर्ण प्रक्रियेवर बारीक लक्ष असते.
भाजपाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी पक्षाचा निवडणुकीतील आत्मविश्वास व्यक्त केला. ते म्हणाले, “पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत भाजपाने ‘अब की बार १०० पार…’ असा नारा दिला आहे. पक्ष शिष्टाचार, शिस्त आणि संघटन ही पक्षाची बलस्थाने आहेत. शहरातील १२८ जागांसाठी इच्छुकांची संख्या मोठी आहे.”
शत्रुघ्न काटे पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात झालेल्या विकासकामांवर व राष्ट्रहिताच्या निर्णयांवर लोकांचा विश्वास वृद्धींगत झाला आहे. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही संघटन मजबूत केले असून, या निवडणुकीत पुन्हा एकदा विजयी पताका फडकवण्यासाठी आम्ही सज्ज झालो आहोत.
© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
