गुन्हे शाखेच्या युनिट-३ ची धडाकेबाज कामगिरी! घरफोडी करून ‘धूम स्टाईल’ने परराज्यात पसार होणारे अट्टल चोरटे जेरबंद
४८ तासांत २५ लाखांचे सोने-चांदीचे दागिने जप्त; उत्तर प्रदेशातील तिघांना चाकण येथे अटक, चार गुन्हे उघडकीस
पिंपरी प्रतिनिधी शाम सोनवणे, दि.११ डिसेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी-चिंचवड शहरात घरफोडी करून ‘धूम स्टाईल’ने परराज्यात पळून जाणाऱ्या अट्टल चोरट्यांना गुन्हे शाखा युनिट-३ ने अवघ्या ४८ तासांत अटक करून मोठी कामगिरी बजावली आहे. या आरोपींकडून तब्बल २५ लाख १३ हजार ५९८ रुपये किमतीचे सोने-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली, गुन्हे शाखा युनिट ३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे आणि पोलीस उपनिरीक्षक भरत गोसावी यांना मिळालेल्या गुप्त बातमीनुसार हे यश मिळाले.
पोलिसांनी चाकण पोलीस स्टेशन हद्दीत इंद्रायणी हॉटेलच्या समोर, पुणे-नाशिक हायवेलगत, वाकी चाकण येथे सापळा लावला. एका पांढऱ्या रंगाच्या टाटा टेम्पोमध्ये विना-नंबरची दुचाकी गाडी आणि समोर केबिनमध्ये तीन संशयित इसम बसलेले दिसले. पथक जवळ जाताच त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र युनिट-३ च्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मोठ्या शिताफीने बळाचा वापर करून तिघांना ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे:
१. मोसीन शौकतअली शेख (वय ३२, रा. लोहियानगर, मेरठ, उत्तर प्रदेश)
२. उदयवीर मलखानसिंग सहासी (वय ३६, रा. जयभीम नगर, मेरठ, उत्तर प्रदेश)
३. विनय कुमार गंगासरन (वय ३४, रा. ग्राम बिजोली, खरखोदा, मेरठ, उत्तर प्रदेश)
आरोपींनी चौकशीत सांगितले की, ते मेरठ, उत्तर प्रदेश येथून एका चारचाकी वाहनात दुचाकी टाकून पिंपरी-चिंचवड शहरात येत असत. येथे वाहन पार्क करून दुचाकीने घरफोडी करायचे आणि त्यानंतर १०० ते १५० किलोमीटर दुचाकीवर प्रवास करायचे, जेणेकरून पोलिसांना थांगपत्ता लागू नये. त्यानंतर निर्जनस्थळी दुचाकी टेम्पोमध्ये टाकून ते थेट मेरठ, उत्तर प्रदेश येथे निघून जात असत.
आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेला टाटा कंपनीचा पांढऱ्या रंगाचा टेम्पो (यु.पी १५ जेटी २५९२), एक होंडा कंपनीची शाईन दुचाकी, एक मोबाईल फोन, इतर साहित्य तसेच सोने-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण १२,१३,५९८ रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. तसेच, १३,००,००० रुपये किमतीचे नवीन एक टेम्पो व दुचाकी ४८ तासांच्या आत जप्त करण्यात आले.
आरोपींनी दाखवलेल्या ठिकाणांवरून एकाच दिवशी केलेल्या चार घरफोड्यांचे गुन्हे उघडकीस आले आहेत:
१. दिघी गुन्हा रजि. नं. ६३३/२०२५
२. चाकण गुन्हा रजि.नं. १०९०/२०२५
३. काळेवाडी गुन्हा रजि. नं. ५८०/२०२५
४. सांगवी गुन्हा रजि. नं. ५८८/२०२५
पोलीस उपनिरीक्षक सुनील जावळे हे यापूर्वी केलेल्या घरफोडीची माहिती घेऊन अधिक तपास करत आहेत.
पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पोलीस सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उप-आयुक्त गुन्हे, डॉ. शिवाजी पवार, सहा. पोलीस आयुक्त गुन्हे, डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
या पथकात वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे यांच्या नेतृत्वात पोउपनि भरत गोसावी, पो. उपनि सुनील जावळे, पोलीस अंमलदार बाबासाहेब गर्जे, सोमनाथ बोऱ्हाडे, सागर सूर्यवंशी, श्रीधन इचके, संदीप सोनवणे, मनोज साबळे, ऋषिकेश भोसुरे, अजित रुपनवर, योगेश कोळेकर, शशिकांत नांगरे, बाळासाहेब भांगले, स्वप्निल महाले, सुंदर थोरात, सगिर काळे, सुधीर दांगट, दिलीप राठोड, तुषार वराडे, निखील फापाळे, प्रदीप राळे, राजकुमार इघारे आणि तांत्रिक विश्लेषक प्रकाश ननावरे यांचा समावेश होता.
© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

