news
Home पिंपरी चिंचवड पेन्शनर्स डे: सेवानिवृत्तीनंतरही सामाजिक बांधिलकी जपा; चिंचवडमध्ये पद्मश्री गिरीश प्रभुणे यांचा निवृत्तांना मोलाचा संदेश

पेन्शनर्स डे: सेवानिवृत्तीनंतरही सामाजिक बांधिलकी जपा; चिंचवडमध्ये पद्मश्री गिरीश प्रभुणे यांचा निवृत्तांना मोलाचा संदेश

'हास्यसम्राट' आनंद खेळकर यांच्याकडून ताणमुक्त जीवनाचा मंत्र; आगामी निवडणुकीत प्रलोभनास बळी न पडता मतदानाची घेतली शपथ. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

निवृत्तीवेतन हा दीर्घ सेवाभावाचा आणि त्यागाचा सन्मान; पेन्शनर्स डे निमित्त पद्मश्री गिरीश प्रभुणे यांचे प्रतिपादन

 

 

पुणे जिल्हा कोषागार कार्यालयात सेवानिवृत्तांना मिळणार तत्पर सेवा; शेकडो पेन्शनधारकांनी घेतला १००% मतदानाचा निर्धार

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि.१९ डिसेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी (दि. १९ डिसेंबर २०२५): “निवृत्तीवेतन ही केवळ आर्थिक तरतूद नसून सेवानिवृत्त व्यक्तींच्या दीर्घ सेवाभावाचा, त्यागाचा आणि योगदानाचा तो खऱ्या अर्थाने सन्मान आहे. सेवानिवृत्तीनंतरही व्यक्तीने सामाजिक बांधिलकी जपली, तर समाजाच्या विकासाला नवी दिशा मिळू शकते,” असे प्रतिपादन पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी केले.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड सेवानिवृत्त सेवक परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजित ‘अखिल भारतीय सेवानिवृत्त वेतनधारक दिन’ (पेन्शनर्स डे) कार्यक्रमात ते बोलत होते. आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


कार्यक्रमात पुणे जिल्हा कोषागार अधिकारी देवराम शेळके यांनी सेवानिवृत्तांच्या अडीअडचणी आणि शासकीय धोरणांवर मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, “पुण्यातील कोषागार भवन अद्यावत करण्यात आले असून, जुनी कागदपत्रे आणि पेन्शन पे ऑर्डर त्वरित उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही विनम्र व तत्पर सेवा देण्यास कटिबद्ध आहोत.”

तर ‘हास्यसम्राट’ ॲड. आनंद खेळकर यांनी सेवानिवृत्तांना जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन दिला. “वय आणि परिस्थिती कशीही असली तरी आपली विनोदबुद्धी जागृत ठेवा, यामुळे मनावरील ताण कमी होतो,” असा सल्ला त्यांनी ‘सेवानिवृत्तीनंतरचे आनंदी जीवन’ या विषयावर बोलताना दिला.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमात एक महत्त्वाचा उपक्रम राबवण्यात आला. उपस्थित शेकडो सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी लोकशाही बळकट करण्यासाठी कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता, निर्भयपणे मतदान करण्याची शपथ घेतली. “आम्ही भारताचे नागरिक, लोकशाहीचे पावित्र्य राखू आणि १००% मतदान करू,” असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

या सोहळ्याला महापालिका उपायुक्त अण्णा बोदडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, परिषदेचे अध्यक्ष प्रकाश जवळकर, शिवाजीराव तापकीर, चंद्रकांत झगडे, गणेश विपट, प्रकाश राऊळकर यांच्यासह मोठ्या संख्येने सेवानिवृत्त कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश जवळकर यांनी केले, तर आभार उपायुक्त अण्णा बोदडे यांनी मानले.


© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!