प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्याला मतदान प्रक्रियेतील सर्व टप्प्यांची सखोल माहिती असणे आवश्यक – अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे
पिंपरी-चिंचवड मनपा निवडणुकीसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांचे दोन दिवसीय प्रशिक्षण संपन्न; ईव्हीएम आणि मॉक पोलचे तांत्रिक धडे
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि.२२ डिसेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी (दि. २२ डिसेंबर २०२५): आगामी १५ जानेवारी २०२६ रोजी होणारी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणूक निर्दोष आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. या प्रक्रियेत ईव्हीएम हाताळणी, मॉक पोल आणि मतदान साहित्य व्यवस्थापन या प्रत्येक टप्प्याची सखोल माहिती प्रत्येक कर्मचाऱ्याला असणे अनिवार्य आहे, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांनी दिले.
चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजित करण्यात आलेले मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकाऱ्यांचे दोन दिवसीय निवडणूक प्रशिक्षण यशस्वीरीत्या संपन्न झाले.
प्रशिक्षणादरम्यान अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांनी कर्मचाऱ्यांना संबोधित करताना सांगितले की, “मतदान केंद्रावर नियुक्त अधिकारी-कर्मचारी हे निवडणूक यंत्रणेचा कणा आहेत. तुमच्या दक्षतेवर आणि समन्वयावरच संपूर्ण प्रक्रियेची विश्वासार्हता अवलंबून आहे. त्यामुळे कोणताही संभ्रम न ठेवता प्रत्येकाने आपली जबाबदारी समजून घ्यावी.”
-
ईव्हीएम हाताळणी: बॅलेट युनिट (BU), कंट्रोल युनिट (CU) आणि व्हीव्हीपॅट (VVPAT) यांची अचूक जोडणी व कार्यपद्धती.
-
मॉक पोल (Mock Poll): प्रत्यक्ष मतदानापूर्वी राजकीय प्रतिनिधींच्या उपस्थितीत घ्यावयाची चाचणी, त्याची नोंदणी आणि त्यानंतर यंत्रे सीलबंद करण्याची प्रक्रिया.
-
साहित्य व्यवस्थापन: मतदानासाठी लागणारे साहित्य ताब्यात घेणे, त्याची तपासणी करणे आणि मतदान संपल्यावर ते जमा करण्याची पद्धत.
-
मतदान केंद्र उभारणी: मतदान कक्षाची रचना, चिन्हांकित मतदार यादी तपासणी आणि मतदानाच्या आदल्या दिवशी करावयाची पूर्वतयारी.
प्रशिक्षणात भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचना, निवडणुकीतील महत्त्वाचे बदल आणि टपाली मतदानाची अंमलबजावणी यावरही प्रकाश टाकण्यात आला. मतदानादरम्यान सुरक्षा व्यवस्था आणि नियमांचे उल्लंघन झाल्यास करावयाची कायदेशीर कार्यवाही याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
या सत्रास सह आयुक्त मनोज लोणकर, उपायुक्त पंकज पाटील, विशेष अधिकारी किरण गायकवाड उपस्थित होते. मुख्य प्रशिक्षक नरेंद्र बंड, रामेश्वर पवार, शिवाजी लाटे, संजीव आनंदकर, किशोर शिंदे, अमोल शिंदे आणि गणेश सुर्वे यांनी प्रत्यक्ष प्रात्याक्षिकांच्या आधारे कर्मचाऱ्यांच्या शंकांचे निरसन केले.
© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
