ऑनलाईन रमीच्या नादात गमावलेले पैसे मिळवण्यासाठी गॅस सिलिंडरचा ट्रकच चोरला; छत्रपती संभाजीनगरमध्ये तिघांना बेड्या
मुख्य आरोपी ट्रक चालकच; ६२ सिलिंडरसह ट्रक पळवून कवडीमोलाने केली विक्री
छत्रपती संभाजीनगर, दि. ३ जानेवारी २०२६, मॅक्स मंथन डेली न्यूज:
छत्रपती संभाजीनगर (दि. ३ जानेवारी २०२६): ऑनलाईन रमी आणि जुगाराच्या नादात हरलेले पैसे वसूल करण्यासाठी एका ट्रक चालकाने चक्क गॅस सिलिंडरने भरलेला ट्रकच चोरल्याचा धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये समोर आला आहे. या प्रकरणी शहर गुन्हे शाखेने मुख्य आरोपीसह तिघांना अटक केली आहे.
मिळालेली माहिती अशी की, २३ डिसेंबरच्या रात्री नरेगाव येथील एचपीसीएल (HPCL) गॅस कंपनीच्या आवारात ६२ सिलिंडरने भरलेला एक ट्रक (क्र. MH-44-U-2309) उभा होता. चालकाने चावी ट्रकमध्येच सोडली होती. हीच संधी साधून आरोपींनी ट्रक पळवून नेला.
-
आरोपींची नावे: मुख्य आरोपी विजय ऊर्फ गुड्डू विश्राम पवार (३८, रा. नरेगाव) हा स्वतः गॅस सिलिंडरच्या ट्रकवर चालक म्हणून काम करतो. त्याचे साथीदार जगदीश ऊर्फ जिगर पटेल (३८, रा. घोडेगाव, नेवासा) आणि अक्षय सोळुंके (२७, रा. मूर्तिजापूर) यांनाही पोलिसांनी अटक केली आहे.
-
गुन्ह्याची पद्धत: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रक चोरल्यानंतर त्यातील सिलिंडर रिकामे करून ते कवडीमोलाने विकण्यात आले. तपासाची दिशा भरकटवण्यासाठी रिकामा ट्रक झाल्टा फाटा परिसरात सोडून देण्यात आला होता.
गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले आणि पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी सांगितले की, विजय पवार याला ऑनलाईन रमी खेळण्याचे मोठे व्यसन होते. यात त्याने मोठ्या प्रमाणावर पैसे गमावले होते. ही तूट भरून काढण्यासाठी आणि चैनीसाठी त्याने आपल्याच कंपनीतील सिलिंडरचा ट्रक चोरण्याचा कट रचला.
गुन्हे शाखेने तांत्रिक तपासाच्या आधारे विजय पवार याला ताब्यात घेतले असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर त्याच्या दोन्ही साथीदारांना अटक करण्यात आली. गुरुवारी तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता, त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
शहरात ऑनलाईन गेमिंगच्या आहारी जाऊन गुन्हेगारीकडे वळणाऱ्या तरुणांचे प्रमाण वाढत असून, पालकांनी आणि नागरिकांनी याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
