महाळुंगे पोलिसांचा धडाका! १३ मोटारसायकलसह वाहन चोरांची टोळी जेरबंद, ५.५० लाखांचा मुद्देमाल हस्तगत
पिंपरी प्रतिनिधी शाम सोनवणे, ६ फेब्रुवारी २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:
चाकण/महाळुंगे : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वाहन चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी सुरू असलेल्या मोहिमेला मोठे यश आले आहे. उत्तर महाळुंगे एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने कौशल्याने तपास करत दोन सराईत चोरट्यांना अटक केली असून, त्यांच्याकडून ५ लाख ५० हजार रुपये किमतीच्या एकूण १३ मोटारसायकल जप्त केल्या आहेत.
महाळुंगे औद्योगिक परिसरात मोटारसायकल चोरीचे प्रमाण वाढत असल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी यांनी तपास पथकाला विशेष सूचना दिल्या होत्या. एका गुन्ह्याच्या तपासादरम्यान (गु.र.नं. ५४/२०२६) पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने पडताळणी केली. यावेळी पोलीस अंमलदार शुभम खंडागळे यांना गोपनीय माहिती मिळाली की, चोरी करणारा इसम आंबेठाण चौक परिसरात राहत आहे. त्यानुसार सापळा रचून निलेश मंडलीक याला ताब्यात घेण्यात आले.
पोलिसी खाक्या दाखवताच आरोपीने आपला साथीदार संदीप सोनवणे याच्या मदतीने चाकण एमआयडीसी व आसपासच्या परिसरातून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे खालीलप्रमाणे आहेत:
१) निलेश राजु मंडलीक (वय २४, रा. आंबेठाण चौक, चाकण; मूळ गाव – कर्जत, जि. अहिल्यानगर)
२) संदिप साहेबराव सोनवणे (वय २५, रा. चापडगाव, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर)
पोलिसांनी आरोपींकडून उत्तर महाळुंगे एमआयडीसी, दक्षिण महाळुंगे, शिक्रापूर, करमाळा, चतु:श्रृंगी आणि चाकण पोलीस स्टेशनच्या हद्दीतून चोरीला गेलेल्या १३ मोटारसायकल जप्त केल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने स्प्लेंडर आणि पल्सर गाड्यांचा समावेश आहे. तपासादरम्यान आणखी ५ संशयास्पद गाड्या मिळून आल्या असून, त्याबाबत अधिक तपास सुरू आहे.
ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, मा. सह पोलीस आयुक्त, डॉ. महावरकर, मा. अप्पर पोलीस आयुक्त, श्री. सारंग अव्हाड, अपर पोलीस आयुक्त बसवराज तेली, पोलीस उप आयुक्त श्वेता खेडकर, आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तपास पथकाचे अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. दिगंबर सुर्यवंशी, सपोनि कल्याण घाडगे पोलीस अंमलदार, राजु कोणकेरी, अमोल बोराटे, विठ्ठल वडेकर, संतोष काळे, गणेश गायकवाड, मंगेश कदम, संतोष वायकर, हरी रणदिवे, शुभम खंडागळे, साहिल सांडभोर आणि सफौ. राजु जाधव यांनी या कारवाईत मोलाची भूमिका बजावली.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
