पिंपरी-चिंचवडच्या महापौरपदी रवी लांडगे तर उपमहापौरपदी शर्मिला बाबर यांची बिनविरोध निवड; सभागृह नेतेपदी प्रशांत शितोळे आणि विरोधी पक्षनेतेपदी भाऊसाहेब भोईर विराजमान!
पिंपरी प्रतिनिधी आकाश कांबळे , ६ फेब्रुवारी २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठीची निवडणूक प्रक्रिया आज पार पडली. अपेक्षेप्रमाणे, महापौरपदी भारतीय जनता पक्षाचे रवी लक्ष्मण लांडगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपमहापौर पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वैशाली काळभोर यांनी आपला अर्ज मागे घेतल्याने भाजपच्या शर्मिला राजू बाबर यांचीही बिनविरोध निवड झाली आहे. यासोबतच, महापालिकेच्या सभागृह नेतेपदी प्रशांत शितोळे आणि विरोधी पक्षनेतेपदी ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पिठासीन अधिकारी तथा सहकार आयुक्त दीपक तावरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या उपस्थितीत ही विशेष सभा यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडली. निवडीनंतर नवनियुक्त महापौर व उपमहापौरांनी आपला पदभार स्वीकारला. यावेळी आमदार उमा खापरे, अमित गोरखे, महेश लांडगे आणि शंकर जगताप यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा शहरवासीयांच्या वतीने सन्मान केला.
सर्वसाधारण सभेच्या सुरुवातीलाच महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर आणि सभागृह नेते प्रशांत शितोळे यांनी श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त केले. अजितदादांच्या निधनामुळे शहरावर असलेल्या शोककळेचे गांभीर्य राखत, नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी सभा स्थगित करण्याची सूचना मांडली. त्यानुसार महापौर रवी लांडगे यांनी सर्वसाधारण सभा २० फेब्रुवारी २०२६ पर्यंत तहकूब केली.
पदभार स्वीकारल्यानंतर महापौर रवी लांडगे आणि उपमहापौर शर्मिला बाबर यांनी महापालिका प्रांगणातील दिवंगत अण्णासाहेब मगर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर शहरातील विविध भागांतील महापुरुषांच्या पुतळ्यांना भेट देऊन त्यांनी आशीर्वाद घेतले.
या सोहळ्यास अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, नगरसचिव मुकेश कोळप, सह आयुक्त मनोज लोणकर, उप आयुक्त अण्णा बोदडे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे यांसह नवनिर्वाचित नगरसदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
