चिंचवडमध्ये ‘वंदे मातरम’च्या जयघोषात रंगला ‘आनंद’ सोहळा! ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापनदिन उत्साहात; ‘स्वत्व’ स्मरणिकेचे प्रकाशन
(७ फेब्रुवारी २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज)
पिंपरी प्रतिनिधी शाम सोनवणे
पिंपरी-चिंचवड : चिंचवड येथील आनंद ज्येष्ठ नागरिक संघाच्या दोन दिवसीय वर्धापनदिन सोहळ्याला शुक्रवारी (दि. ६) मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. पहिल्या दिवशी ‘वंदे मातरम’ या संकल्पनेवर आधारित व्याख्यान, स्मरणिका प्रकाशन आणि सभासदांच्या देशभक्तीपर गीत गायनाने कार्यक्रमात चैतन्य निर्माण झाले.
या सोहळ्यात प्रसिद्ध व्याख्याते तुकाराम चिंचणीकर यांनी ‘वंदे मातरम’ या विषयावर अभ्यासपूर्ण व्याख्यान दिले. “कोणताही समाज नष्ट करायचा असेल, तर त्यांची शिक्षण पद्धती नष्ट करायला हवी, हे ब्रिटिशांनी जाणले होते. मात्र, बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेल्या ‘वंदे मातरम’ गीताने भारतीयांना राष्ट्रधर्माची दीक्षा दिली,” असे त्यांनी नमूद केले. या प्रेरणेतूनच संघाच्या सभासदांनी देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर खेडकर, त्यांचे शिष्य प्रमुख पाहुणे यादवराव शिंदे व जिजाराम शिंदे यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर माजी नगरसेवक राजू गोलांडे, व्याख्याते तुकाराम चिंचणीकर, उपाध्यक्ष अशोक नागणे आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रमुख पाहुणे जिजाराम शिंदे यांनी ज्येष्ठांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “तुम्ही जितके निरिच्छ व्हाल, तितके जास्त समाधान तुम्हाला मिळेल. मित्र आणि नातेवाईकांसाठी सर्वकाही करा, पण त्याबदल्यात कोणाकडूनही अपेक्षा ठेवू नका. अपेक्षाभंग झाला नाही की पश्चातापाचे दुःख होत नाही.”
यावेळी मान्यवरांच्या हस्ते संघाच्या विशेष स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. याकामी परिश्रम घेणारे संपादक माधव जोशी, उपसंपादक अश्विनी कोटस्थाने आणि संपादकीय मंडळाचा विशेष सत्कार करण्यात आला.
संघाचे सचिव रवींद्र कुलकर्णी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला, तर कार्याध्यक्ष प्रिया जोशी यांनी सूत्रसंचालन केले. मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या सभासदांच्या उत्साहामुळे सोहळ्याला वेगळीच रंगत आली होती.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
