‘बनावट पोलीस’ बनून लुटणाऱ्या इराणी टोळीचा पर्दाफाश! पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेने अंबिवलीतून आरोपीला ठोकल्या बेड्या; १२० सीसीटीव्ही आणि वेशांतर करून केला पाठलाग
पिंपरी प्रतिनिधी आकाश कांबळे , १५ फेब्रुवारी २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी-चिंचवड : वयोवृद्ध महिला आणि पुरुषांना “आम्ही पोलीस आहोत” असे भासवून, त्यांच्या सोन्याचे दागिने हातचलाखीने काढून घेणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट-२ च्या पथकाने मोठ्या धाडसाने अटक केली आहे. मोहम्मद सय्यद कंबर अली (वय ४०, रा. इराणी वस्ती, अंबिवली, ठाणे) असे या अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्यावर विविध राज्यांत अनेक गुन्हे दाखल आहेत.
मागील काही दिवसांत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वयोवृद्धांना लुटण्याचे प्रकार वाढले होते. हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असाच एक प्रकार घडला होता. यामध्ये आरोपींनी पोलीस असल्याचे भासवून वृद्धांना गाठले आणि “पुढे गुन्हेगार आहेत, तुमचे दागिने काढून रुमालात ठेवा” असे सांगून हातचलाखीने दागिन्यांची चोरी केली होती. याप्रकरणी हिंजवडीत गुन्हा दाखल होताच पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी तात्काळ तपासाचे आदेश दिले होते.
गुन्हे शाखा युनिट-२ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवली.
-
सीसीटीव्ही तपासणी: पथकाने अंदाजे १०० ते १२० सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली, ज्यातून आरोपी हे ठाणे जिल्ह्यातील अंबिवली येथील इराणी वस्तीतील असल्याचे निष्पन्न झाले.
-
वेशांतर करून सापळा: गुन्हे शाखेचे पथक सलग दोन दिवस अंबिवलीत वेशांतर करून दबा धरून बसले होते.
-
अटकाव झुगारून कारवाई: १३ फेब्रुवारी रोजी आरोपीला ताब्यात घेत असताना इराणी वस्तीतील त्याच्या नातेवाईकांनी पोलिसांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, पथकाने मोठ्या धाडसाने आरोपीला ताब्यात घेऊन पिंपरी-चिंचवडला आणले.
आरोपी मोहम्मद सय्यद कंबर अली याने प्राथमिक तपासात खालील गुन्ह्यांची कबुली दिली आहे:
१) हिंजवडी पोलीस ठाणे: गु.र.क्र. ८२/२०२६ (BNS २०४, ३१९(२), ३(५)).
२) देहूरोड पोलीस ठाणे: गु.र.क्र. २५७/२०२५ (BNS २०४, ३१९(२), ३(५)).
सदर आरोपी हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून, इतर राज्यांतील त्याच्या गुन्ह्यांची माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे. जर या आरोपीने कोणाची फसवणूक केली असेल किंवा तो इतर कोणत्या गुन्ह्यात हवा असल्यास, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह-पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त बसवराज तेली, सारंग आवाड, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) प्रदिप जाधव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पथकात अरविंद पवार, पोउपनि मयुरेश साळुंखे, विक्रम कुदळ, तुषार शेटे, मोहम्मद गौस नदाफ आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा समावेश होता.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
