महाराष्ट्र-पंजाबचे आध्यात्मिक नाते अभेद्य! घुमान अभ्यास दौऱ्यातील संतपीठ सदस्यांचा महापौरांच्या हस्ते गौरव; नामदेवरायांच्या मंदिरात पहिल्यांदाच घुमले वारकरी परंपरेचे ‘हिंदी कीर्तन’
पिंपरी प्रतिनिधी बालाजी नवले, १६ फेब्रुवारी २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी : “शिख संप्रदायाचा पवित्र धर्मग्रंथ ‘गुरु ग्रंथ साहिब’मध्ये संत नामदेव महाराजांच्या वाणीचा समावेश असणे, हे महाराष्ट्र आणि पंजाबमधील घट्ट आध्यात्मिक नात्याचे प्रतीक आहे. भक्ती, समता आणि मानवतेचा हा वारसा राष्ट्रीय एकात्मतेचे उत्तम उदाहरण आहे,” असे गौरवपूर्ण प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले.
पिंपरी-चिंचवड महापालिका संचलित जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठाच्या वतीने पंजाबमधील घुमान येथे नुकताच ५ दिवसीय अभ्यास दौरा पार पडला. या दौऱ्यात सहभागी झालेल्या १८ सदस्यांचा पिंपरी चिंचवड महापालिकेच्या दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.
संत शिरोमणी नामदेव महाराज यांनी प्रदीर्घ काळ वास्तव्य केलेल्या घुमान येथील मंदिरात संतपीठाचे संचालक हभप राजू महाराज ढोरे यांचे कीर्तन संपन्न झाले. विशेष म्हणजे, नामदेवरायांच्या मूळ मंदिरात महाराष्ट्रातील वारकरी सांप्रदायिक परंपरेनुसार प्रथमच हिंदी भाषेत कीर्तन सेवा पार पडली. “तू अगाध वैकुंठनायका | तेरे चरणो मेरा माथा ||” या अभंगावर राजू महाराज यांनी निरूपण केले. यापूर्वी १९७० मध्ये हभप ज्ञानेश्वर माऊली देहूकर यांनी येथे सप्ताह केला होता, त्यानंतर हा ऐतिहासिक मान संतपीठाला मिळाला.
या अभ्यास दौऱ्यात संतपीठाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा उपायुक्त संदीप खोत, शिक्षणाधिकारी संगीता बांगर, संचालिका डॉ. स्वाती मुळे, प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर गाडगे यांच्यासह विविध विषयांच्या शिक्षकांचा समावेश होता. या पथकाने घुमानमधील खालील संस्थांना भेटी देऊन तेथील शैक्षणिक उपक्रमांचा अभ्यास केला:
-
घुमान इंटरनॅशनल पब्लिक स्कूल
-
बाबा नामदेवजी गव्हर्नमेंट डिग्री कॉलेज
-
बाबा आया सिंग रिअरकी कॉलेज
या सोहळ्याला विशेष अधिकारी किरण गायकवाड, संगीत शिक्षक महेश शेळके, अविनाश भोगील, चंद्रकांत गोसावी, विलास कोकाटे, शिक्षिका मंगल अंबरे, अर्चना देसाई, सुचेता पुजारी, मुग्धा शिरोडकर, पौर्णिमा इंगळे, अनिकेत चासकर आणि अखिल पोखरकर उपस्थित होते.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

