निगडीत घुमली ‘शिवशंभो गर्जना’! छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्वाचा दिमाखदार शुभारंभ; उद्यापासून रंगणार ‘शिवगर्जना’ महानाट्य
पिंपरी प्रतिनिधी आकाश कांबळे , १६ फेब्रुवारी २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी-चिंचवड : “छत्रपती शिवाजी महाराज की जय… जय भवानी, जय शिवाजी” अशा आसमंत भेदणाऱ्या जयघोषात आणि तुताऱ्यांच्या निनादात निगडी येथील भक्ती-शक्ती समूह शिल्प परिसर शिवमय झाला. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्व २०२६’ चा दिमाखदार शुभारंभ रविवारी ‘शिवशंभो गर्जना’ या कार्यक्रमाने झाला. १५ ते १९ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत चालणाऱ्या या प्रबोधन पर्वातून शिवरायांचा देदीप्यमान इतिहास आणि क्रांतिकारी विचारांचा वारसा जनमानसात पोहचवला जात आहे.
या प्रबोधन पर्वाची सुरुवात अंबेजोगाई येथील सुप्रसिद्ध कलाकार अभिजीत जाधव आणि आमु जाधव यांच्या ‘शिवशंभो गर्जना’ या कार्यक्रमाने झाली. पहाडी आवाजातील पोवाडा, अस्सल मातीतील शाहिरी, भक्तीरसाने न्हालेली गवळण आणि समाजप्रबोधन करणाऱ्या भारुडाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी उपमहापौर तथा नगरसदस्या शैलजा मोरे यांच्या हस्ते संपन्न झाले.
या सोहळ्याप्रसंगी नगरसदस्य उत्तम केंदळे, ज्येष्ठ समाजसेवक मारुती भापकर, उपायुक्त अण्णा बोदडे, जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, सामाजिक कार्यकर्ते जीवन बोराडे, धनाजी येळकर पाटील, सागर तापकीर, आबा ढवळे, अभिषेक म्हसे, संतोष कवडे, ओमकार पवळे, शाहीर प्रकाश ढवळे, विशाल बोंगाळे, स्वप्नील शिंदे, रोहिदास शिवणेकर, श्रीमंत जगताप, सागर लष्करे, नाना काळभोर, राजेंद्र काटे आणि संग्राम मगर यांच्यासह शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रबोधन पर्वाचा मुख्य आकर्षण असलेला ‘शिवगर्जना’ हा महानाट्याचा प्रयोग १७, १८ व १९ फेब्रुवारी रोजी निगडी येथील नियोजित महापौर निवास परिसरात सादर होणार आहे.
-
सहभाग: २५० हून अधिक कलाकार, घोडे, उंट आणि भव्य नेपथ्य.
-
खास वैशिष्ट्य: राष्ट्रपती महोदयांसमोर सादर झालेले हे महानाट्य नेत्रदीपक आतिषबाजी आणि ध्वनीसंयोजनाच्या माध्यमातून शिवचरित्रातील प्रसंग जिवंत करणार आहे.
-
उद्घाटन: महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते उद्या १७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६:३० वाजता या महानाट्याचा शुभारंभ होईल.
महापौर रवि लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर आणि आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा भव्य सोहळा शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर घालत आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.


