अजितदादांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या विकासाचा ‘कारभारी’ हरपला! चिंचवडमध्ये बहुजन विकास आघाडीच्या वतीने भावपूर्ण शोकसभा; शेकडो नागरिकांकडून श्रद्धांजली
पिंपरी प्रतिनिधी आकाश कांबळे, १७ फेब्रुवारी २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:
चिंचवड : महाराष्ट्राच्या राजकारणातील एक कणखर नेतृत्व आणि प्रशासनावर मजबूत पकड असलेले माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अकाली निधनामुळे निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी आहे. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी बहुजन विकास आघाडीच्या वतीने चिंचवड स्टेशन परिसरात भावपूर्ण शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित मान्यवर आणि नागरिकांनी दोन मिनिटे मौन पाळून लाडक्या नेत्याला साश्रू नयनांनी निरोप दिला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे आणि वासुदेव बळवंत फडके यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर बहुजन विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष संजय धुतडमल यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, “अजितदादा हे केवळ नेते नव्हते, तर निर्णयक्षमता आणि कामाच्या शिस्तीचे प्रतीक होते. सिंचन, वित्त आणि प्रशासकीय क्षेत्रात त्यांनी महाराष्ट्राला दिलेली दिशा सदैव स्मरणात राहील. त्यांच्या कठोर स्वभावामागे राज्याच्या प्रगतीची तळमळ होती.”
या शोकसभेला विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून दादांच्या आठवणींना उजाळा दिला. यामध्ये प्रामुख्याने खालील मान्यवर उपस्थित होते:
-
आर्यन आखाडे (स्वीय सहाय्यक, विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे)
-
प्रा. नामदेवराव जाधव (अध्यक्ष, छत्रपती शासन पक्ष)
-
मारुती भापकर (माजी नगरसेवक तथा सामाजिक कार्यकर्ते)
-
भाऊसाहेब अडागळे (अध्यक्ष, महाराष्ट्र मजूर पक्ष)
-
प्रल्हाद कांबळे (अध्यक्ष, फेरीवाले पथारी संघटना)
-
मनोज क्षिरसागर (प्रदेशाध्यक्ष), महेंद्र निशिगंध (कार्याध्यक्ष) व अक्षय म्हात्रे (जिल्हाध्यक्ष).
यावेळी ज्येष्ठ नेते नानासाहेब कांबळे, महिला जिल्हाध्यक्षा ज्योतीताई शिंदे, दशरथ कांबळे, कोमल शिंदे, मिलिंद सोनवणे, दिलीप खिलारे, कैलास कसबे, कोमल वाघमोडे, गौरव कांबळे, प्रतिक धुतडमल यांच्यासह असंख्य कार्यकर्ते, युवक आणि महिला उपस्थित होत्या. “सामान्य शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या प्रश्नावर तात्काळ निर्णय घेणारा धाडसी प्रशासक आम्ही गमावला आहे,” अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
संपूर्ण चिंचवड परिसरात यावेळी अत्यंत शोकमय वातावरण होते. अजितदादांनी दाखवलेल्या विकासाच्या मार्गावर पुढे जाणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असा संकल्प यावेळी करण्यात आला.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
