महापौर रवि लांडगे यांचा “माझा फार्मासिस्ट, माझा अभिमान” पुरस्काराने गौरव! केमिस्ट असोसिएशनतर्फे आपल्या ‘सहकाऱ्याचा’ जंगी सन्मान
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, १७ फेब्रुवारी २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी : “मी स्वतः फार्मासिस्ट असल्यामुळे आरोग्य क्षेत्रातील आव्हाने मी जवळून अनुभवली आहेत. समाजाच्या आरोग्य सुरक्षेत केमिस्ट बांधवांची भूमिका कळीची आहे. महापालिकेच्या माध्यमातून औषध विक्रेत्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी आणि आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी मी सदैव कटिबद्ध राहीन,” अशी ग्वाही महापौर रवि लांडगे यांनी दिली.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौरपदी निवड झाल्याबद्दल ‘पिंपरी चिंचवड केमिस्ट असोसिएशन’च्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. महापालिका मुख्य प्रशासकीय भवनातील महापौर कक्षात हा सोहळा पार पडला. यावेळी महापौर लांडगे यांना “माझा फार्मासिस्ट, माझा अभिमान” हे विशेष गौरवचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. एक फार्मासिस्ट सहकारी शहराच्या प्रथम नागरिकपदी विराजमान झाल्याने संपूर्ण शहरातील केमिस्ट समुदायात आनंदाचे वातावरण आहे.
सत्काराला उत्तर देताना महापौर पुढे म्हणाले की, “केमिस्ट असोसिएशनने दिलेला हा सन्मान माझ्यासाठी अत्यंत भावनिक आहे. हा सन्मान केवळ माझा नसून संपूर्ण फार्मासिस्ट समुदायाचा आहे. प्रशासन आणि आरोग्य व्यावसायिक यांच्यात समन्वय वाढवून सर्वसामान्यांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळवून देणे हेच माझे मुख्य ध्येय असेल.”
या प्रसंगी पुणे जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष विवेक तापकीर, पीआरओ सचिन धोका, पिंपरी चिंचवड केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष रवी पवार, सचिव चेतन शिंगवी, खजिनदार नंदू पानसरे उपस्थित होते. तसेच भोसरी केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष वसुदेव चव्हाण, संघटक राजेश टोपे, किरण थोरवे, अंकुश परांडे, उमेश देसाई, टाव्हरे, महिला संघटक मोहिनी कोळी, पवन टिंगरे, विशाल टेकाळे आणि विनोद टोपे यांच्यासह मोठ्या संख्येने केमिस्ट बंधू-भगिनी उपस्थित होते.
हा क्षण पिंपरी चिंचवडमधील औषध विक्रेत्यांसाठी अभिमानास्पद असल्याची भावना यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

