‘शिवचरित्र हाच नीतिमत्ता व चारित्र्य जपण्याचा खरा मंत्र’; किवळ्यात प्रा. विक्रम कदम यांचे झंझावाती व्याख्यान; आदर्श नगरमध्ये शिवजन्मोत्सव उत्साहात
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, २२ फेब्रुवारी २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी : “जागतिक इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव असे राजा आहेत ज्यांनी शत्रूच्या स्त्रीलाही मातेसमान मानले. आजच्या काळात जेव्हा जागतिक स्तरावर ‘जाफरी एपिस्टीन’ सारखी विकृत प्रकरणे उघड होत आहेत, तेव्हा मानवी नीतिमत्ता आणि चारित्र्य कसे जपावे, हे शिकण्यासाठी शिवचरित्राचा अभ्यास करणे ही काळाची गरज आहे,” असे परखड प्रतिपादन प्रसिद्ध शिवचरित्रकार प्रा. विक्रम कदम यांनी केले.
किवळे येथील जय श्रीराम चौक, शिवशंभो कॉलनी, आदर्श नगर येथे आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्यात ‘शिवचरित्र आणि आजची स्थिती’ या विषयावर ते बोलत होते. यावेळी परिसरातील ७०० हून अधिक नागरिकांनी या व्याख्यानाला हजेरी लावली होती.
प्रा. कदम यांनी आपल्या व्याख्यानात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नीतिमत्तेवर प्रकाश टाकला. ते म्हणाले की, “राजमाता जिजाऊंनी शिवबांना स्त्री म्हणजे मराठ्यांच्या देव्हाऱ्यातील देवता आहे, असे संस्कार दिले. औरंगजेबाचा इतिहासकार खापी खान यानेही महाराजांचे वर्णन ‘नीतिमान राजा’ असे केले आहे. मात्र, आजचे काही राज्यकर्ते आणि उद्योगपती शिवचरित्र विसरल्यामुळेच समाजात विकृती वाढत आहे.” त्यांनी यावेळी अमेरिकेतील एपिस्टीन फाईल प्रकरणाचा उल्लेख करत, अशा क्रूर कर्मा लोकांपासून समाजाला वाचवण्यासाठी शिवविचारांची गरज अधोरेखित केली.
कार्यक्रमाची सुरुवात भक्ती-शक्ती (निगडी) येथून आणलेल्या शिवज्योतीने झाली. स्थानिक महिलांच्या हस्ते शिवजन्माचा पाळणा सोहळा संपन्न झाला. जिजाऊ वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाल्यानंतर परिसरातील लहान मुलांसाठी पोवाडे आणि भाषण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या सोहळ्याला किवळे शहरातील विद्यमान नगरसेवक निलेश तरस, ऐश्वर्या तरस, धर्मपाल तंतरपाळे, रेश्माताई कातळे उपस्थित होते. तसेच माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, सामाजिक कार्यकर्ते लखन तरस, शाहूराज कदेरे आणि सिद्दिक भाई शेख यांनी सदिच्छा भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे अध्यक्ष महेश शिंदे पाटील, आदर्श नगर सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष तायप्पा धनगर आणि कार्याध्यक्ष अरुण खेत्री यांनी या महोत्सवाचे नेटके आयोजन केले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सचिन पाटील, चेतन शितोळे, बसप्पा खेत्री, अमोल विटकर, रामदास घोटकुले आणि माजी सैनिक मधुकरराव माने यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेश शिंदे पाटील यांनी केले, सूत्रसंचालन प्रियांका पोळ यांनी तर आभार प्रदर्शन फिरोज आलम यांनी मानले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
