मेळघाटातील सुरक्षा आणि सुविधांना मिळणार बळ! गृहराज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्याकडून धारणी पोलीस ठाण्याचा आढावा; विद्यार्थ्याना पुस्तक वाटप
धारणी,अमरावती,०१ मार्च २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:
धारणी : “अमरावती जिल्ह्यातील धारणी आणि चिखलदरा या दुर्गम भागांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. मेळघाटातील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन या परिसराचा कायापालट करण्यावर आमचा भर असून, प्रामुख्याने येथील नागरी सुविधा आणि सुरक्षितता अधिक बळकट करण्यात येईल,” असे प्रतिपादन राज्याचे गृहराज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केले.
डॉ. भोयर यांनी काल धारणी पोलीस स्टेशनला भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी आमदार केवलराम काळे, प्रभुदास भिलावेकर, नगराध्यक्ष सुनील चौथमल, जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद आणि प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ शुक्ला यांची प्रमुख उपस्थिती होती.

गृहराज्यमंत्र्यांनी धारणी पोलीस स्टेशनमधील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती जाणून घेतली. गुन्हे तपास प्रक्रियेला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या ‘फॉरेन्सिक वाहनाचे’ उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच, पोलीस ठाण्याच्या परिसरात नागरिकांसाठी उभारण्यात आलेल्या पाणपोईचे लोकार्पणही यावेळी पार पडले.
स्थानिक लोकप्रतिनिधींच्या पुढाकाराने विद्यार्थ्यांसाठी बांधण्यात आलेल्या नवीन अभ्यासिका इमारतीची डॉ. भोयर यांनी पाहणी केली. या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत यश मिळवावे, या उद्देशाने त्यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त पुस्तकांचे वाटप केले. मेळघाटचा विकास करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली विविध योजना प्रभावीपणे राबविल्या जातील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
या दौऱ्याप्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी महादेव गरुड, तहसीलदार प्रदीप शेवाळे, पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक संध्या चव्हाण, गटविकास अधिकारी विजय गायकवाड आणि गटशिक्षणाधिकारी वैभव लादे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

