पिंपरी-चिंचवड पोलिसांची धडाकेबाज कारवाई! कोणताही सुगावा नसताना घरफोडी करणाऱ्या महिलेला ठोकल्या बेड्या; ८ लाखांचे सोने हस्तगत
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, १० मार्च २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात घरफोडीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्तालयाकडून विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत, सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या एका मोठ्या घरफोडीचा छडा लावण्यात गुन्हे शाखा युनिट १ ला यश आले आहे. विशेष म्हणजे, कोणताही ठोस पुरावा किंवा सुगावा नसताना केवळ कौशल्यपूर्ण तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी एका महिलेला अटक केली असून, तिच्याकडून ८ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.
सांगवी पोलीस ठाण्यात २५ फेब्रुवारी २०२६ रोजी घरफोडीचा गुन्हा (रजि. क्र. ६८/२०२६) दाखल करण्यात आला होता. अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या घरातून सुमारे ५ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले होते. भारतीय न्याय संहिता कलम ३०५(अ) आणि ३३१(३) नुसार या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला होता.
पोलीस आयुक्त श्री. विनय कुमार चौबे, सह-पोलीस आयुक्त श्री. शशिकांत महावरकर आणि अपर पोलीस आयुक्त श्री. सारंग आव्हाड यांनी दिलेल्या मार्गदर्शनानुसार गुन्हे शाखा युनिट १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र ठाकरे यांनी तपासाची चक्रे फिरवली.
तपास पथकाने गोपनीय खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीचा आधार घेत एका संशयित महिलेला ताब्यात घेतले. तिची सखोल चौकशी केली असता, तिने ही घरफोडी केल्याची कबुली दिली. तिच्याकडून पोलिसांनी तब्बल ८ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत केले असून, या कारवाईमुळे घरफोडीचे २ गुन्हे उघडकीस आले आहेत.
ही यशस्वी कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सपोनि दत्तात्रय गुळीग, पोलीस उपनिरीक्षक कर्मराज गावडे, पोलीस हवालदार महादेव जावळे, शिवराम भोपे, महिला पोलीस हवालदार उषा दळे, दीपक तांदळे, तेजस भालचिम, संदेश देशमुख, खेडकर आणि विजय जानराव यांच्या पथकाने केली आहे.
डॉ. शिवाजी पवार (पोलीस उपायुक्त, गुन्हे) यांनी या कारवाईबद्दल पथकाचे कौतुक केले आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव।
