मूर्तिजापूर महसूल शिबिरात ‘जनसंवाद’ की फक्त ‘देखावा’? प्रसारमाध्यमांना रोखल्याने पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह; ‘सेटिंग’ची चर्चा रंगली
अकोला /मुर्तिजापुर प्रतिनिधी विलास सावळे, १५ मार्च २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज
मूर्तिजापूर (अकोला) : शासनाच्या “छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर – टप्पा १ (जनसंवाद कार्यक्रम)” अंतर्गत पुंडलिक नगर येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमावर आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांच्या महसूल विषयक समस्या सोडवण्यासाठी असलेल्या या शासकीय उपक्रमापासून स्थानिक प्रसारमाध्यमांनाच जाणीवपूर्वक दूर ठेवण्यात आल्याने, या कार्यक्रमात नेमकी काय ‘सेटिंग’ झाली? असा संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
शासनाच्या ‘शासन आपल्या दारी’ या संकल्पनेनुसार ७/१२ उतारा, फेरफार, वारस नोंद आणि सीमांकन यांसारख्या प्रश्नांवर थेट तोडगा काढण्यासाठी हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. मात्र, इतक्या महत्त्वपूर्ण शासकीय कार्यक्रमाचे निमंत्रण स्थानिक पत्रकारांना का दिले गेले नाही, हा आता चर्चेचा विषय ठरला आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या माध्यमांना दूर ठेवल्यामुळे प्रशासनाच्या पारदर्शकतेवर शंका उपस्थित केली जात आहे.
प्रसारमाध्यमांच्या गैरहजेरीमुळे हा कार्यक्रम खरोखरच सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी ऐकण्यासाठी होता की केवळ वरिष्ठांना कागदोपत्री अहवाल सादर करण्यासाठी केलेली ‘औपचारिकता’ होती, असा सवाल आता विचारला जात आहे. अर्ज आणि तक्रारींचे निराकरण आधीच ठरवून सर्वकाही ‘सेटिंग’नुसार पार पाडण्यात आले का? अशी चर्चा आता पुंडलिक नगर परिसरात रंगली आहे.
प्रशासन जेव्हा जनतेच्या दारी पोहोचते, तेव्हा त्या कामाची माहिती जनतेपर्यंत पोहोचणे अपेक्षित असते. मात्र, माहिती दडवण्याच्या या प्रकारामुळे शिबिरातील कामकाजाबाबत संशय निर्माण झाला आहे. माध्यमांना निमंत्रण न देण्यामागे नेमका कोणाचा दबाव होता की काही त्रुटी लपवण्यासाठी हा घाट घातला गेला, अशी विचारणा होत आहे.
महसूल विभागाने या कार्यक्रमाबाबत निर्माण झालेल्या शंकांना उत्तर द्यावे आणि प्रसारमाध्यमांना दूर ठेवण्यामागचे अधिकृत कारण स्पष्ट करावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून भविष्यात अशा उपक्रमांमध्ये पारदर्शकता राखली जावी, अशी अपेक्षा मूर्तिजापूरकर व्यक्त करत आहेत.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव।
