शहरात ‘गॅस पाईपलाईन’चे जाळे विस्तारणार! महानगरपालिका आणि MNGL समन्वयाने काम करणार; महापौर रवि लांडगे यांचा पुढाकार
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी: बालाजी नवले, १६ मार्च २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी : पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांना सुरक्षित, स्वस्त आणि पर्यावरणपूरक इंधन उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (MNGL) आणि महानगरपालिका प्रशासन आता एकत्रितपणे प्रयत्न करणार आहेत. “शहरातील नैसर्गिक वायू प्रकल्पांना गती देण्यासाठी दोन्ही यंत्रणांनी समन्वयातून काम करावे, जेणेकरून विकासकामांना विलंब होणार नाही,” असे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले.
शहरात पाईप्ड नॅचरल गॅस (PNG) आणि सीएनजी प्रकल्पांच्या कामांचा आढावा घेण्यासाठी आज महापौर दालनात ‘एमएनजीएल’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक पार पडली.
-
परवानगी प्रक्रिया सुलभ करणार: एमएनजीएलला पाईपलाईन टाकण्यासाठी कराव्या लागणाऱ्या खोदकामाच्या परवानग्या महापालिकेकडून लवकर कशा मिळतील, यावर सविस्तर चर्चा झाली.
-
सुरक्षितता आणि पर्यावरण: घरगुती गॅस पाईपलाईनमुळे सिलिंडरच्या वाहतुकीचा त्रास कमी होऊन नागरिकांना अधिक सुरक्षित सेवा मिळेल, यावर महापौरांनी भर दिला.
-
प्रकल्प गतीने राबवणार: शहरातील नवीन समाविष्ट भाग आणि गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये गॅस पोहोचवण्याचे काम युद्धपातळीवर घेण्याचे नियोजन करण्यात आले.
बैठकीनंतर महापौर रवि लांडगे यांनी एमएनजीएलच्या शिष्टमंडळासह नूतन महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेतली. या विषयाची गंभीरता लक्षात घेऊन, आयुक्तांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना एमएनजीएलच्या प्रलंबित परवानग्यांबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आणि परवानगी प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.
या बैठकीला महापालिकेचे मुख्य अभियंता प्रमोद ओंबासे, एमएनजीएलचे व्यवस्थापकीय संचालक कुमार शंकर, व्यवसायिक संचालक शंकर करजगी आणि भाग्यश्री मंथलकर उपस्थित होते.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव।
