पुणेकरांचा मोठा विजय! ६८९ झाडे तोडण्याच्या प्रस्तावाला स्थगिती; ‘रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट’ विरोधात पर्यावरणप्रेमींची जोरदार कायदेशीर लढाई
पुणे/पिंपरी प्रतिनिधी आकाश कांबळे, २१ मार्च २०२६ | मॅक्स मंथन पर्यावरण विशेष:
पुणे : वाकड बायपास ते सांगवी पुलादरम्यानच्या ‘रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट’ (RFD) प्रकल्पासाठी तब्बल ६८९ झाडे तोडण्याच्या पुणे महानगरपालिकेच्या प्रस्तावाला शुक्रवारी मोठा धक्का बसला. पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिकांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे वृक्ष अधिकारी विजय नायकल यांनी या प्रकरणाची सुनावणी तहकूब केली असून, हा प्रस्ताव (Docket) रद्द करण्याची शिफारस वरिष्ठ स्तरावर करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
पर्यावरण कार्यकर्त्या रेखा जोशी यांनी न्यायालयाच्या निर्णयाचा दाखला देत प्रशासनाचे वाभाडे काढल्याने हा निर्णय घेण्यात आला.
सुनावणीदरम्यान रेखा जोशी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या (फेब्रुवारी २०२६) अभिजीत मोहन अंतुरकर विरुद्ध पीएमसी ट्री अथॉरिटी या खटल्यातील निकालाचा संदर्भ दिला. त्यांनी प्रशासनाच्या जाहिरात प्रक्रियेवर खालील प्रश्न उपस्थित केले:
-
अपूर्ण जाहिराती: महापालिका वृत्तपत्रात जाहिरात देताना नागरिकांना माहितीसाठी वेबसाईटवर जाण्यास सांगते. मात्र, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, जाहिरातीमध्ये अर्जदार कोण आहे, झाडे का तोडायची आहेत, किती झाडे आहेत आणि त्यांची नेमकी जागा कुठे आहे, ही संपूर्ण माहिती असणे बंधनकारक आहे.
-
पारदर्शकतेचा अभाव: “प्रशासन जाहिरातीत ही माहिती कधीच देत नाही. नागरिकांना अंधारात ठेवून झाडे तोडण्याची घाई केली जात आहे,” असा आरोप जोशी यांनी केला.
वृक्ष अधिकारी विजय नायकल यांनी रेखा जोशी यांनी मांडलेले कायदेशीर मुद्दे ग्राह्य धरले. जाहिरात प्रक्रियेतील कायदेशीर त्रुटींबाबत त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्याचे आश्वासन दिले आहे. या प्रस्तावावर सध्या कोणतीही पुढील कार्यवाही होणार नसल्याने वृक्षप्रेमींनी समाधान व्यक्त केले आहे.
रिव्हरफ्रंट प्रकल्पाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होणार असल्याने पुणेकर गेल्या अनेक महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. ६८९ झाडे वाचवण्याच्या दिशेने मिळालेले हे यश म्हणजे नागरी शक्तीचा मोठा विजय मानला जात आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव।
