संकटकाळात माणुसकीचा हात! रहाटणीतील अग्निबाधित धेंडे कुटुंबाला भाजप नगरसेवकांचा आर्थिक आधार; आमदार शंकर जगताप यांच्याकडून मदतीचे आदेश
पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी : बालाजी नवले ,२३ मार्च २०२६ | मॅक्स मंथन विशेष:
रहाटणी : रहाटणी येथील पवना नगर परिसरात रविवारी (२२ मार्च) शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत सर्वस्व गमावलेल्या सपना बाळासाहेब धेंडे यांच्या कुटुंबाला भाजपच्या वतीने मदतीचा हात देण्यात आला आहे. चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक लोकप्रतिनिधींनी या कुटुंबाची भेट घेऊन त्यांना तातडीची आर्थिक मदत सुपूर्द केली.
या दुर्दैवी घटनेत धेंडे कुटुंबाचे राहते घर आणि घरातील सर्व जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच आमदार शंकर जगताप यांच्या सूचनेनुसार नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य बाबासाहेब त्रिभुवन, नगरसेविका सविता खुळे आणि माजी स्वीकृत सदस्य गोपाळ माळेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. धेंडे कुटुंबाचे सांत्वन करत त्यांनी वैयक्तिक स्तरावर आर्थिक मदत प्रदान केली. “आम्ही या कठीण काळात तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत,” असा विश्वास यावेळी लोकप्रतिनिधींनी दिला.
केवळ तात्पुरती मदतच नव्हे, तर शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठीही प्रयत्न सुरू झाले आहेत:
-
तात्काळ पंचनामा: तहसीलदार जयराज देशमुख यांच्या आदेशानुसार तलाठी प्रीती शेवाळे यांनी नुकसानीचा पंचनामा पूर्ण केला आहे.
-
संजय गांधी निराधार योजना: या कुटुंबाला ‘संजय गांधी निराधार योजने’तून कायमस्वरूपी आर्थिक सहाय्य मिळावे, यासाठी आमदार शंकर जगताप यांनी संबंधित विभागाला तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते नरेश आप्पा खुळे, ऋषी नखाते, सुनील नखाते यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकप्रतिनिधींच्या या तत्परतेमुळे धेंडे कुटुंबाला मोठा मानसिक आधार मिळाला आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव।

