news
Home पिंपरी चिंचवड नव्या आयुक्तांची ‘अग्निपरीक्षा’! मंत्रालयातील हस्तक्षेपाला लगाम लावून ‘दूध का दूध, पानी का पानी’ होणार का?

नव्या आयुक्तांची ‘अग्निपरीक्षा’! मंत्रालयातील हस्तक्षेपाला लगाम लावून ‘दूध का दूध, पानी का पानी’ होणार का?

प्रशासक राजवटीतील 'अलिबाबा आणि ४० चोरांच्या' कारभाराची चिरफाड! १८ पैशांचे काम करून संपूर्ण रुपया गिळंकृत करण्याच्या प्रवृत्तीवर संपादकीय प्रहार. | २९ मार्च २०२६ | मॅक्स मंथन विशेष

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

संपादकीय: पिंपरी-चिंचवड पालिकेतील ‘काळ्या धंद्यांची’ श्वेतपत्रिका काढाच; नव्या आयुक्तांसमोर भ्रष्टाचाराचा डोंगर पोखरण्याचे आव्हान

 

 

 

 पिंपरी चिंचवड, दिनांक: २९ मार्च २०२६, © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्तपदी डॉ. विजय सूर्यवंशी यांची नियुक्ती झाल्यापासून शहरात त्यांच्यापुढील आव्हानांची मोठी चर्चा सुरू झाली आहे. मात्र, केवळ आव्हानेच नव्हे, तर गेल्या चार वर्षांच्या प्रशासकीय राजवटीत पालिकेच्या तिजोरीवर जो दिवसाढवळ्या दरोडा टाकण्यात आला, त्याची ‘श्वेतपत्रिका’ काढणे हे त्यांच्यापुढील सर्वात मोठे आणि नैतिक कर्तव्य ठरणार आहे.

नव्या आयुक्तांच्या उपस्थितीत तब्बल १४ तास चाललेल्या सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय सदस्यांनी प्रशासकीय काळातील भ्रष्टाचाराचे वाभाडे काढले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका सदस्याने तर “अलिबाबा आणि ४० चोरांनी पालिका धुवून खाल्ली” अशा जहाल शब्दांत माजी प्रशासक शेखर सिंह आणि अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांच्या कार्यकाळातील कारभारावर ताशेरे ओढले. अलिबाबा गेले तरी उरलेले चोर अजूनही पालिकेतच असून त्यांचे लूटमारीचे काम सुरूच असल्याचा खळबळजनक आरोप यावेळी करण्यात आला.

पिंपरी पालिकेच्या इतिहासात गेल्या चार वर्षांत भ्रष्टाचाराने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. “ऊस गोड लागला म्हणून तो मुळासकट खाऊ नये” या उक्तीला हरताळ फासत, प्रशासकीय यंत्रणेने पालिकेची तिजोरी अक्षरशः भिकेला लावली आहे. १८ पैशांचे काम करून संपूर्ण रुपया गिळंकृत करण्याचे लाजिरवाणे प्रकार सर्वच विभागांत घडले आहेत. ही ‘मुळासकट खाण्याची’ प्रवृत्ती आता पालिकेच्या पाचवीलाच पुजली आहे की काय, असा प्रश्न करदात्या नागरिकांना पडला आहे.

सभागृहातील वादळी चर्चा आणि सदस्यांचा संताप केवळ हवेत विरून जाऊ नये, यासाठी या ‘काळ्या धंद्यांची’ श्वेतपत्रिका काढणे अनिवार्य आहे. प्रत्येक कंत्राट आणि प्रत्येक व्यवहाराचे सत्य जनतेसमोर येणे हा नागरिकांचा हक्क आहे. मात्र, या लूटमारीत अनेकांचे हात बरबटलेले असल्याने आणि मंत्रालयातील ‘सहाव्या मजल्या’पर्यंत या भ्रष्टाचाराचे धागेदोरे पोहचलेले असल्याने, खरोखरच श्वेतपत्रिका निघणार का? हा मोठा प्रश्न आहे.

आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना सर्वात आधी आपल्या आजूबाजूला वावरणाऱ्या ‘झारीतले शुक्राचार्य’ ओळखावे लागतील. डॉ. श्रीकर परदेशी यांच्या काळातील शिस्त पुन्हा आणणे आणि टक्केवारीच्या राजकारणात माहीर असलेल्या नेत्यांच्या हातातील बाहुले न बनणे, ही त्यांच्यासाठी मोठी अग्निपरीक्षा असेल. मंत्रालयातील बड्या दलालांचा हस्तक्षेप रोखणे त्यांना शक्य होईल का, यावरच त्यांच्या कार्यकाळाचे यश अवलंबून आहे.

पिंपरी पालिकेत वर्षानुवर्षे सुरू असलेला हा ‘चोर-पोलीस’ खेळ थांबवून पारदर्शक कारभाराचे ‘रामराज्य’ आणण्याचे स्वप्न नागरिक पाहत आहेत. आता राज्य सरकार आणि नवे आयुक्त ‘दूध का दूध, पानी का पानी’ करणार की ‘नळी फुंकली सोनारे…’ या उक्तीप्रमाणे पुन्हा तेच वारे वाहणार, हे येणारा काळच ठरवेल.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!