news
Home अकोला सावधान! जाहिरातीतील नोकरीच्या आमिषाने अकोल्यातील व्यक्तीला ८० लाखांचा गंडा

सावधान! जाहिरातीतील नोकरीच्या आमिषाने अकोल्यातील व्यक्तीला ८० लाखांचा गंडा

हायप्रोफाईल ओळखींचे आमिष दाखवून लुबाडले; दोन आरोपींना ३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

नोकरीच्या नावाखाली ८० लाखांची फसवणूक; अकोला सायबर पोलिसांची पालघरमध्ये धडक कारवाई, दोघांना अटक

 

 

 

अकोला/पालघर प्रतिनिधी विलास सावळे, दिनांक: १ एप्रिल २०२६, मॅक्स मंथन डेली न्यूज:

अकोला/पालघर: वृत्तपत्रातील जाहिरातीद्वारे अर्धवेळ आणि पूर्णवेळ नोकरीचे आमिष दाखवून तब्बल ८० लाख ५ हजार ८३० रुपयांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळीचा अकोला सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी मुंबईजवळील पालघर येथून एका महिलेसह दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांना ३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

अकोला येथील फिर्यादी हिरासिंग स्वरूपसिंग ठाकूर यांनी १५ डिसेंबर २०२५ रोजी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यांनी एका वृत्तपत्रात रोजगाराशी संबंधित जाहिरात पाहिली होती. दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधला असता, त्यांना सुरुवातीला १००० रुपये रजिस्ट्रेशन फी भरण्यास सांगण्यात आले.

त्यानंतर, “हायप्रोफाईल महिला व मुलींशी मैत्री करायची आणि वेळ घालवायचा, त्यातून महिन्याला २० हजार रुपये पगार मिळेल,” असे आमिष आरोपींनी दाखवले. इतकेच नाही तर, मसाजसाठी लागणारी यंत्रसामग्री आणि औषधी विकत घेतल्यास कंपनीत इन्व्हेस्टर होऊन अधिक नफा कमावता येईल, असे सांगून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. या आमिषाला बळी पडून फिर्यादीने टप्प्याटप्प्याने तब्बल ८०,०५,८३० रुपये गुंतवले. मात्र, कोणतेही साहित्य किंवा नफा न मिळता उलट अधिक पैशांची मागणी होऊ लागल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून अकोला पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञान आणि डिजिटल पुराव्यांच्या आधारे तपास सुरू केला. तपासाची चक्रे फिरवत पोलीस पथक पालघर (मुंबई) येथे रवाना झाले.

स्थानिक पोलिसांच्या मदतीने ३० मार्च २०२६ रोजी पोलिसांनी खालील दोन आरोपींना ताब्यात घेतले:

१. रुबीना फारूक शेख

२. अतिष दिलीप गुप्ता

अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना ३१ मार्च रोजी अकोला येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्री. एन. ए. शर्मा यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. सरकारी अभियोक्ता श्रीमती अर्चना सूर्यवंशी यांनी मांडलेली बाजू ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपींना ३ एप्रिल २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

ही धडाकेबाज कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिल जुमळे, सपोनी मनीषा तायडे, पोहवा प्रशांत केदारे, कुंदन खराबे, तेजस देशमुख, महिला पोलीस अंमलदार किरण वाडेकर आणि चालक श्रीहरी कराळे यांच्या पथकाने केली.

नागरिकांना आवाहन: वृत्तपत्रे किंवा सोशल मीडियावरील अनोळखी जाहिरातींना बळी पडू नका. नोकरीच्या नावाखाली कोणालाही आगाऊ पैसे देऊ नका. फसवणूक झाल्यास त्वरित सायबर पोलिसांशी संपर्क साधावा.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!