news
Home पिंपरी चिंचवड पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीचा फुसका बार! पोलीस आयुक्तालयाजवळील अद्ययावत बसथांब्यावर सुविधांचा बोजवारा

पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीचा फुसका बार! पोलीस आयुक्तालयाजवळील अद्ययावत बसथांब्यावर सुविधांचा बोजवारा

"२४ तासांत बाकडे आणि वेळापत्रक लावा, अन्यथा टाळेबंदी ठोकू"; राष्ट्रवादीचे अर्बन सेल शहराध्यक्ष प्रदीप गायकवाड यांचा प्रशासनाला थेट अल्टिमेटम, परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

स्मार्ट सिटीच्या नावाखाली प्रवाशांची क्रूर थट्टा; पोलीस आयुक्तालयाजवळील बसथांब्यावर ना बाकडे, ना वेळापत्रक, चोहोबाजूला दुर्गंधीचे साम्राज्य!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, ११ जून २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहराला ‘स्मार्ट’ बनविण्याचा दावा करणाऱ्या स्मार्ट सिटी प्रकल्पाचा आणखी एक ढिसाळ आणि संतापजनक कारभार चव्हाट्यावर आला आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून शहरात उभारण्यात आलेले आधुनिक बसथांबे सध्या प्रवाशांसाठी त्रासदायक ठरत आहेत. अत्यंत वर्दळीच्या आणि संवेदनशील अशा पोलीस आयुक्तालयाच्या अगदी अलिकडे असलेल्या बसथांब्यावर प्रवाशांना बसण्यासाठी साधे बाकडेही बसविण्यात आलेले नाही. त्यामुळे तासंतास ताटकळत उभे राहावे लागत असल्याने नागरिक आणि महिला प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

या गंभीर समस्येवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) अर्बन सेलचे शहराध्यक्ष प्रदीप गायकवाड यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या सुस्त कारभारावर कडाडून टीका केली आहे.

शहरात स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत अद्ययावत तंत्रज्ञानाचा डामडौल मिरवत लाखो रुपये खर्च करून आकर्षक बसथांबे (Bus Shelters) उभे करण्यात आले आहेत. मात्र, या डिझायनर थांब्यांमध्ये प्रवाशांना बसण्यासाठी साधे बाकडे (Benches) बसवण्याचे शहाणपण प्रशासनाला सुचलेले नाही. बस येईपर्यंत वृद्ध, महिला, लहान मुले आणि आजारी प्रवाशांना तासंतास उभे राहावे लागते.

याविषयी तीव्र आक्षेप नोंदवताना प्रदीप गायकवाड म्हणाले, “स्मार्ट सिटीसारख्या कोट्यवधींच्या प्रकल्पात बसथांब्यावर प्रवाशांना बसण्यासाठी बाकडे असावेत, यासाठी सामान्य जनतेला आणि राजकीय पक्षांना वारंवार निवेदने द्यावी लागतात, हीच मुळी अत्यंत लाजीरवाणी बाब आहे. प्रशासनाला प्रवाशांच्या प्राथमिक गरजांचीही जाणीव नसावी का?”

पोलीस आयुक्तालयाच्या अगदी जवळ असलेल्या या बसथांब्याची अवस्था सध्या अत्यंत बिकट झाली आहे. या ठिकाणी कधीही नियमित स्वच्छता केली जात नाही. बसथांब्याच्या आजूबाजूला आणि पाठीमागे कचऱ्याचे मोठे ढीग साचलेले आहेत. प्लास्टिक पिशव्या, खरकटं अन्न आणि घाणीमुळे संपूर्ण परिसरात तीव्र कुबट आणि दुर्गंधीयुक्त वास पसरलेला आहे. स्वच्छतेचा बोजवारा उडाल्यामुळे प्रवाशांना नाक दाबून तिथे उभे राहावे लागते. “असुन अडचण नसून खोळंबा” अशीच काहीशी अवस्था या बसथांब्याची झाली आहे.

स्मार्ट बसथांब्यांवर डिजिटल फलक किंवा वेळापत्रक असणे अपेक्षित असताना, या ठिकाणी बस येण्या-जाण्याचे कोणतेही अधिकृत वेळापत्रक लावण्यात आलेले नाही. यामुळे बस कधी येईल आणि कधी सुटेल, याचा कोणताही नेम नसतो. संपूर्ण ‘रामभरोसे’ पद्धतीने प्रवाशांना अंधारात ठेवून वाट पाहावी लागत आहे. या सर्व असुविधांमुळे कंटाळलेले अनेक प्रवासी आता या बसथांब्यावर थांबणेच टाळत असून, त्यांना जीव मुठीत धरून रस्त्यावर इतरत्र उभे राहावे लागत आहे.

या गंभीर विषयावर तात्काळ तोडगा काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अर्बन सेलचे शहराध्यक्ष प्रदीप गायकवाड यांनी प्रशासनाला अंतिम इशारा दिला आहे. ते म्हणाले की, “आम्ही लवकरच स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या मुख्य अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून सविस्तर मागण्यांचे निवेदन सादर करणार आहोत. या निवेदनाद्वारे आमची प्रशासनाला स्पष्ट ताकीद असेल की, एकतर या जागेवरील बसथांबा तात्काळ इतर सोयीच्या ठिकाणी स्थलांतरित करा, किंवा तिथे २४ तासांच्या आत बसण्यासाठी दर्जेदार बाकडे बसवावेत. तसेच, या परिसराची तात्काळ स्वच्छता करून प्रवाशांना दुर्गंधीपासून मुक्ती द्यावी.”

जर प्रशासनाने या रास्त मागण्यांची वेळीच दखल घेतली नाही आणि प्रवाशांचे हाल थांबवले नाहीत, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने स्मार्ट सिटी कार्यालयावर तीव्र स्वरूपाचे टाळेबंदी आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही गायकवाड यांनी दिला आहे.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!