news
Home पिंपरी चिंचवड राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या अबोली जरीतचा पिंपरी मनपाकडून दिमाखदार बहुमान!

राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या अबोली जरीतचा पिंपरी मनपाकडून दिमाखदार बहुमान!

महापौर रवि लांडगे व आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत सर्वसाधारण सभेत रंगला सोहळा; पिंपरीच्या 'दिव्यांग भवन' प्रकल्पाचे अबोलीकडून देशपातळीवर कौतुक | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

“सर्वश्रेष्ठ दिव्यांगजन” राष्ट्रीय पुरस्कार विजेती व इंडियन आयडॉल फेम गायिका अबोली जरीत हिचा पिंपरी-चिंचवड मनपाच्या वतीने ऐतिहासिक गौरव!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, १६ जून २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: “आयुष्यात कितीही कठीण प्रसंग, संकटे आणि आव्हाने आली तरी कधीही खचून न जाता स्वतःवर अढळ विश्वास ठेवून पुढे जात राहणे हाच यशाचा खरा मार्ग आहे. संघर्ष हा माणसाला अधिक बळकट बनवतो. अडचणींपासून पळून न जाता त्यांचा धैर्याने सामना केल्यास त्यातूनच यशाचे नवे मार्ग आणि नव्या संधी निर्माण होत असतात,” असा अत्यंत प्रेरणादायी आणि सकारात्मक विचार राष्ट्रपती पुरस्कार विजेती आणि ‘इंडियन आयडॉल’ फेम दिव्यांग गायिका अबोली जरीत हिने व्यक्त केला.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आयोजित विशेष सर्वसाधारण सभेमध्ये अबोली जरीत हिचा तिच्या अद्वितीय कर्तृत्वाबद्दल महापौर रवि लांडगे यांच्या शुभहस्ते शाल, मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन अत्यंत दिमाखात गौरव करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना ती बोलत होती.

या सोहळ्याला शहराचे प्रथम नागरिक महापौर रवि लांडगे यांच्यासह पालिका प्रशासनातील आणि राजकीय क्षेत्रातील अनेक प्रमुख मान्यवर उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, क्रीडा, कला, साहित्य आणि सांस्कृतिक समितीचे सभापती कैलास कुटे, आणि शिवसेना गटनेते विश्वजीत बारणे उपस्थित होते.

तसेच माजी महापौर योगेश बहल, नगरसदस्य शत्रुघ्न काटे, अनिल घोलप, अर्चना करांडे, सुलभा उबाळे, प्रा. उत्तम केंदळे, माजी नगरसदस्या गिरीजा कुदळे, नगरसचिव मुकेश कोळप, उप आयुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, आणि जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह सर्व नगरसेवक व विविध विभागांचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपल्या मनोगतामध्ये अबोलीने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने उभारलेल्या ऐतिहासिक ‘दिव्यांग भवन’ प्रकल्पाचे मनापासून कौतुक केले. ती म्हणाली, “पिंपरी-चिंचवड शहराकडून मिळालेल्या या आदरातिथ्यामुळे मी अत्यंत आनंदी आहे. येथे आल्यानंतर मला महानगरपालिकेच्या ‘दिव्यांग भवन’ला प्रत्यक्ष भेट देण्याची संधी मिळाली. हे दिव्यांग भवन पाहून मी खरोखरच भारावून गेले आहे. दिव्यांग बांधवांच्या सर्व गरजा, त्यांच्या अडचणी आणि त्यांच्या सुविधेचा विचार करून इतक्या सर्वसमावेशक पद्धतीने उभारण्यात आलेली वास्तू मी यापूर्वी संपूर्ण भारतात कुठेही पाहिली नव्हती. देशातील हे पहिले आणि अद्ययावत ‘दिव्यांग भवन’ पाहणे हा माझ्यासाठी अत्यंत समृद्ध आणि प्रेरणादायी अनुभव ठरला आहे.”

अबोलीने पुढे बोलताना शहराविषयी आणि इथल्या नागरिकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. ती म्हणाली, “या शहराची ऊर्जा कमालीची आहे. आज सर्वसाधारण सभेत झालेल्या या सन्मानाने मला नवी ताकद दिली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये पाऊल ठेवल्यापासून मला इथल्या लोकांकडून इतके प्रेम मिळाले की, मी या शहरात पहिल्यांदाच आले आहे, असा परकेपणा मला अजिबात जाणवला नाही. येथील लोकप्रतिनिधींनी आणि प्रशासनाने मला आपल्या घरातील घटकासारखे सामावून घेतले आहे.”

अबोलीच्या संघर्षाची कहाणी ऐकताना संपूर्ण सभागृह भावूक झाले होते, तर तिच्या या यशाबद्दल सर्वपक्षीय नगरसेवकांनी बाके वाजवून तिचे कौतुक केले. संपूर्ण कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी चोखपणे पार पाडले.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!