मावळमधील ‘कुंडमळा’ दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पोलिसांचे मोठे पाऊल; कासारसाई येथील मोठा पूल जड वाहनांसाठी तातडीने बंद!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, १७ जून २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: मावळ तालुक्यातील कुंडमळा येथील पूल दुर्घटनेसारखी कोणतीही दुर्दैवी व भीषण दुर्घटना घडू नये याकरिता पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या वाहतूक शाखेने अत्यंत तातडीने एक मोठा निर्णय घेतला आहे. मुळशी आणि मावळ परिसराला जोडणाऱ्या राज्य मार्ग १३० वरील कासारसाई येथील नदीवरील मोठा पूल अत्यंत धोकादायक आणि कमकुवत झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे या पुलावरून होणारी सर्व प्रकारची जड व अवजड वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली असून, ती पर्यायी मार्गाने वळवण्याचे कडक आदेश वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख यांनी दिले आहेत.
हा निर्णय तात्काळ म्हणजेच दिनांक १७ जून २०२६ पासून पुढील आदेश येईपर्यंत लागू करण्यात आला असून, प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी ही तात्पुरती वाहतूक नियंत्रण अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील पिरंगुट, घोटावडे, माण, हिंजवडी, मारुंजी, कासारसाई, चांदखेड ते उरसे रस्ता (राज्य मार्ग १३०, साखळी क्रमांक किमी २२/४००) वरील कासारसाई येथील मोठा पूल अतिशय कमकुवत आणि वापरण्यासाठी धोकादायक झाला असल्याचे कार्यकारी अभियंता आणि जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कार्यालय पुणे (गृहशाखा) यांनी अधिकृतपणे कळवले आहे.
सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असल्याने नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत कोणतीही जीवितहानी किंवा मोठी दुर्घटना घडू नये, यासाठी प्रशासनाने केवळ हलकी वाहने या पुलावरून सुरू ठेवून सर्व जड वाहनांना तात्काळ प्रवेशबंदी लागू केली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक सुरक्षित व सुरळीतपणे होण्याकरिता, महाराष्ट्र शासन गृह विभागाच्या २७ सप्टेंबर १९९६ च्या नोटिफिकेशन नुसार प्राप्त झालेल्या मोटार वाहन कायदा कलम ११५, ११६(१) (ए) (बी), ११६(४) आणि ११७ अन्वये पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख यांनी जुने सर्व वाहतूक निर्बंध रद्द करून पुढील नवीन आदेश लागू केले आहेत. कासारसाई चौकमार्गे आणि दत्तवाडी नेरे चौकमार्गे कासारसाई पुलावरून जाणाऱ्या सर्व प्रकारच्या जड व अवजड वाहनांच्या वाहतुकीस पूर्णपणे मनाई करण्यात येत आहे. जड व अवजड वाहने ही आता साखर कारखाना – दारुंब्रे – सांगवडे – जांबे – नेरे – दत्तवाडी या पर्यायी मार्गाने ये-जा करतील.
पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख यांनी ही अधिसूचना जारी करताना संबंधित विभागांना खालीलप्रमाणे चोख अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत. या विभागाच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी सदर अधिसूचेची अत्यंत काटेकोरपणे अंमलबजावणी होण्याकरिता तात्काळ आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात आणि जड वाहनांना या मार्गावरून जाण्यापासून मज्जाव करावा. संबंधित विभागाने या धोकादायक पुलाच्या दोन्ही बाजूला वाहतूक निर्बंधांचे स्पष्ट फलक (बॅनर) लावावेत. तसेच जड वाहनांना चुकूनही पुलावर प्रवेश करता येऊ नये, यासाठी तातडीने हायवेवर योग्य ठिकाणी ‘हाईट बॅरिअर’ (Height Barrier) बसवावेत. जिल्हा माहिती व प्रसिद्धी अधिकारी, नवीन मध्यवर्ती इमारत (पुणे – ०१), मा. पोलीस आयुक्त कार्यालय पिंपरी-चिंचवड मधील प्रेस रूम प्रभारी अधिकारी यांना या बातमीचा आणि अधिसूचेचा प्रसार सर्व वर्तमानपत्रे व प्रसारमाध्यमांतून करण्याची विनंती करण्यात आली आहे, जेणेकरून वाहनधारकांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती निर्माण होईल.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
