पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांचा कौतुकास्पद उपक्रम! ‘एक दिवस शाळेसाठी’ मोहिमेत आज १८३५ विद्यार्थ्यांना रस्ते सुरक्षा व सायबर गुन्ह्यांचे धडे; आतापर्यंत १ लाख १३ हजार विद्यार्थ्यांचे प्रबोधन
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, १६ जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी चिंचवड: विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासूनच रस्ते सुरक्षा, वाहतुकीचे नियम आणि सामाजिक भान रुजावे यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक शाखेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘एक दिवस शाळेसाठी’ या अत्यंत स्तुत्य आणि विद्यार्थीभिमुख उपक्रमाचा ३१ वा टप्पा आज यशस्वीरित्या पार पडला. या विशेष मोहिमेअंतर्गत आज गुरुवारी शहरातील १४ शाळांमधील तब्बल १८३५ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून वाहतूक पोलिसांच्या पथकांनी त्यांना विविध संवेदनशील विषयांवर पीपीटी (PPT) द्वारे अत्यंत मुद्देसूद मार्गदर्शन केले.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील वाहतूक शाखेच्या वतीने दर महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या गुरुवारी हा अनोखा उपक्रम राबविला जातो. या मोहिमेसाठी वाहतूक शाखेच्या एकूण १४ विशेष टीम तयार करण्यात आल्या आहेत. या टीम गुरुवारी निश्चित केलेल्या शाळांमध्ये जातात.
आज पार पडलेल्या ३१ व्या टप्प्यात वाहतूक शाखेच्या १२ पोलीस अधिकारी आणि १८ अंमलदारांच्या पथकाने थेट शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. केवळ रस्ते सुरक्षाच नव्हे, तर सद्यस्थितीत निर्माण होणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी विद्यार्थ्यांना महत्त्वाच्या मुद्द्यांवर मार्गदर्शन करण्यात आले. रस्त्यावरून चालताना घ्यावयाची काळजी, वाहतुकीचे नियम आणि सुरक्षित प्रवासाचे महत्त्व. अपघातांची कारणे आणि ते टाळण्यासाठी पाळावयाचे नियम.अंमली पदार्थ आणि कोणत्याही प्रकारच्या व्यसनाधीनतेपासून तरुणाईने दूर राहणे का गरजेचे आहे, यावर समुपदेशन. सायबर सोशल मीडियाचा वापर करताना घ्यावयाची खबरदारी, सायबर फसवणूक आणि इंटरनेट विश्वातील सुरक्षितता.
पिंपरी-चिंचवड वाहतूक विभागाने सुरू केलेल्या या मोहिमेला शहरात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. आजच्या ३१ व्या टप्प्यासह या उपक्रमांतर्गत आतापर्यंत एकूण ५०२ शाळांमध्ये जाऊन तब्बल १,१३,१७१ (१ लाख १३ हजार १७१) विद्यार्थ्यांना यशस्वीरित्या प्रबोधनपर मार्गदर्शन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी भविष्यात देशाचे जबाबदार नागरिक आणि एक चांगला माणूस बनावे, याच उदात्त दृष्टीकोनातून वाहतूक शाखेने या भव्य उपक्रमाचे नियोजन केले आहे.
हा अत्यंत प्रभावी उपक्रम पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त श्री. विनयकुमार चौबे, पोलीस सह-आयुक्त श्री. शशिकांत महावरकर, आणि अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. सारंग आवाड यांच्या थेट मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. वाहतूक शाखेचे पोलीस उप-आयुक्त श्री. विक्रांत देशमुख यांच्या नेतृत्वात वाहतूक शाखेच्या सर्व पोलीस अधिकारी आणि अंमलदारांनी आजचा टप्पा यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
शहरातील शाळा, शिक्षक, पालकांकडून आणि विद्यार्थ्यांमधून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, या विद्यार्थीभिमुख मोहिमेचा पुढील टप्पा गुरुवार, दिनांक ६ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उप-आयुक्त विक्रांत देशमुख यांनी प्रेसनोटद्वारे दिली आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.


